
वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या या आजीबाईंचा उत्साह व तरतरी तरुणाईलाही लाजविणारा आहे. आजही त्या भल्या पहाटे उठतात. घरच्या कामालाही जमेल तसा हातभार लावतात. विशेष म्हणजे त्यांच्या डोळ्यालासुद्धा स्पष्ट दिसते. वयानुसार कणा वाकला असला; तरी काठीचा आधार लागत नाही.
धारगाव (जि. भंडारा) : सुखदु:खाचे उन्हाळे पावसाळे सोसलेली जुनी खोडे कुठल्याही संकटात न डगमगता उभी राहतात आणि कुटुंबातील लहानग्यांचाही आधारवड बनतात. धारगावच्या अनंताबाईही तशाच. खरेतर अलिकडे वयाची चाळिशी ओलांडली की लोकांना विविध आजार जडतात. रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, ताणतणाव या व्याधी जणू बदलत्या जीवनशैलीच्या घटक झाल्या आहेत. परंतु, कष्टाळू व मेहनती शरीर, योग्य खानपान व साधे राहणीमान यामुळे आजही जुनी माणसे टिकून व तग धरून आहेत.
टेकेपार-माडगी येथील अनंताबाई पंचबुद्धे यासुद्धा त्यापैकी एक. त्यांनी 25 जून रोजी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. शंभरावा वाढदिवस आपल्या नातवांसह मोठ्या उत्साहाने साजरा केला.
अनंताबाई यांचे माहेर टेकेपार येथील आहे. माहेरची परिस्थिती हलाखीची. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना लहानपणापासूनच परंपरेने शेतीकामे करावी लागायची. शेतकऱ्याची मुलगी असल्याने तिला शेतीची सर्व कामे आलीच पाहिजेत, अशी घरची शिकवण होती. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणणे, शेण उचलणे, सडा, सारवण करणे, पेरणी, रोवणी, कापणी या सर्व कामांत आजी लहानपणापासूनच पारंगत होती. लग्न झाल्यानंतरसुद्धा संसाराला हातभार लावण्यासाठी अनंताबाई गावापासून लांब अंतरावरील गावांत पायी पायी कामावर जायच्या. कधीकधी तर उपाशीच राहून दिवस काढण्याचे प्रसंगसुद्धा आले. पतीचेही लवकरच निधन झाले. मात्र, त्या खचल्या नाहीत. पती हयात नसतानाही तिने खंबीरपणे काबाडकष्ट करून एक मुलगा व मुलगी यांचे योग्यप्रकारे संगोपन केले.
सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही
तरुणाईलाही लाजविणारा उत्साह
वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या या आजीबाईंचा उत्साह व तरतरी तरुणाईलाही लाजविणारा आहे. आजही त्या भल्या पहाटे उठतात. घरच्या कामालाही जमेल तसा हातभार लावतात. विशेष म्हणजे त्यांच्या डोळ्यालासुद्धा स्पष्ट दिसते. वयानुसार कणा वाकला असला; तरी काठीचा आधार लागत नाही.
रानभाज्यांच्या सेवनाने त्यांची प्रकृती आजही ठणठणीत आहे. मुलगा रविशंकर पंचबुद्धे, मुलगी, नातू पराग, प्रणय, सून, भाऊ, भाचे अशा लेकुरवाळ्या कुटुंबात त्यांची मायेने काळजी घेतली जाते.