...आणि नक्षल चळवळीच्या वाटेवरील युवक परतला घरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

मिर्धा याने या पाच व्यक्तींची कधीही हत्या करून कारागृहात शिक्षा भोगली असती, असेही पत्रकात नमूद करून आजीवन कारावास झाल्यास लोकांचे कर्ज फेड करता आले नसते, असेही लिहिले होते. नक्षल चळवळीत सहभागी झाल्याने, आपल्या या पाच व्यक्तींचा बदला घेऊन त्यांचा खून करता येईल व सुरक्षित राहून जीवन जगता येईल, अशी धमकीही यात होती.

एटापल्ली(गडचिरोली) : लोकांना कंटाळून आपण नक्षल चळवळीत जात असल्याचे पत्रक व्हॉट्‌सऍप ग्रूपवर टाकून बेपत्ता झालेला येथील युवक अखेर सात महिन्यानंतर परत आला आहे. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत अखेर त्याला परत आणण्यात यश मिळवले. राज उर्फ नीतिश मिर्धा (वय ३०), असे या युवकाचे नाव आहे.

ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर

राज मिर्धा याने २२ जानेवारी २०२० च्या मध्यरात्री दीड वाजता दरम्यान एका व्हाट्‌सऍप ग्रुपवर पत्रक पोस्ट केले होते. काही लोकांच्या जाचाला कंटाळून नक्षल चळवळीत सामील झालो असून मला त्रास देणाऱ्या त्या सर्वांना धड़ा शिकवणार आहे, असा मजकूर त्यात लिहिला होता. तब्बल सात महिने शोध घेऊन पोलिसांनी त्याला सुखरूप घरी पोहचवले आहे. राज मिर्धा किरकोळ धान खरेदी, वीटभट्टी व ट्रॅक्‍टरवरून धान मळणी मशिनचा व्यवसाय करी होता. या व्यवसायातील प्रतिस्पर्धी म्हणून भीमराव देवतळे, बोनामाली दास, सुभाष दास, गौतम कर्मकार, सर्व रा. एटापल्ली, संजय मंडल रा. मुलचेरा अशा पाच व्यक्तींमुळे माझी प्रतिष्ठा डागाळली गेल्याचे त्याने म्हटले होते. आपली आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे नमूद करून माझ्यावर अनेक व्यक्तींचे कर्ज झाले आहे. मी ते काही काळात त्यांच्या घरी पोहचते करून फेड करणार आहे. मात्र मला कोणी पैसे देणार असतील , तर त्यांनी अनाथ आश्रमात दान करावे, असाही मजकूर त्याने पोस्ट केलेल्या पत्रकातून होता. मिर्धा याने या पाच व्यक्तींची कधीही हत्या करून कारागृहात शिक्षा भोगली असती, असेही पत्रकात नमूद करून आजीवन कारावास झाल्यास लोकांचे कर्ज फेड करता आले नसते, असेही लिहिले होते. नक्षल चळवळीत सहभागी झाल्याने, आपल्या या पाच व्यक्तींचा बदला घेऊन त्यांचा खून करता येईल व सुरक्षित राहून जीवन जगता येईल, अशी धमकीही यात होती. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. राज मिर्धाच्या नातेवाइकांनी तो घरून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. मात्र पोलिसांनी राज मिर्धाला शोधून काढल्यानंतर त्याने खरी माहिती दिली. तो मजकूर लिहून केलेली व्हॉट्‌सऍप पोस्ट रागाच्या भरात केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून त्याचा नक्षल चळवळीत सामील होण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे राज मिर्धा याने म्हटले आहे. अहेरी पोलिस मुख्यालयाचे अप्पर पोलिस अधीक्षक कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड व पोलिस शिपाई देवेंद्र दुर्गे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज मिर्धाशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्याला परत येण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज मिर्धा सोमवारी (ता. २४) एटापल्लीत परत आला. त्यानंतर त्याला पोलिसांनी धीर देऊन सुखरूप घरी पोहचविले आहे.

असे घालवले दिवस...
एटापल्ली येथून बेपत्ता झालेल्यानंतर राज मिर्धा याने वणवण भटकतच हे दिवस काढले. त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तो एटापल्लीतून बेपत्ता झाल्यानंतर प्रथम दिल्ली, आग्रा, मथुरा, नेपाळ, मुंबई, असा फिरून रोजगार शोधत होता. त्याला कोठेही योग्य रोजगार मिळत नसल्याने तो उत्तर प्रदेशातील त्याचे बहिणीकडे राहून कामधंदा करीत होता.
 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... and the youth on the path of Naxal movement returned home