संतापलेले भाजीविक्रेते भरविणार गंजवॉर्डात बाजार 

श्रीकांत पेशट्टीवार
Monday, 10 August 2020

जून महिन्यात हा बाजार पूर्ववत गंजवॉर्डात नेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने १८० विक्रेत्यांची यादी तयार केली. गंजवॉर्डातील भाजी बाजाराची नव्याने आखणी करून गाळ्यांची रचना निर्धारित केली.

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गंज वॉर्डातील भाजीबाजार कोहिनूर तलावात स्थानांतरित करण्याचा आला. त्यानंतर मागील चार महिन्यांच्या कालावधीत मनपा प्रशासनाने गंजवॉर्डातील भाजीबाजाराची नव्याने आखणी केली. मात्र, अजूनही गाळेधारकांना बाजार सुरू करण्याबाबत सूचित केले नाही. त्यामुळे संतापलेल्या भाजीविक्रेत्यांनी १० ऑगस्टपासून गंजवॉर्डात भाजीबाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले. सर्व बाजारपेठा बंद असल्या तरी अत्यावश्‍यक सेवा या काळात सुरू होत्या. परंतु, त्या सुरू ठेवताना सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम आखून देण्यात आले. गंजवॉर्डातील भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्‍य होणार नसल्याने महापालिका प्रशासनाने कोहिनूर तलावात भाजीबाजार स्थानांतरित केला. या निर्णयाला भाजीविक्रेत्यांनीही समर्थन देत आपापली दुकाने हलविली. 

जून महिन्यात हा बाजार पूर्ववत गंजवॉर्डात नेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने १८० विक्रेत्यांची यादी तयार केली. गंजवॉर्डातील भाजी बाजाराची नव्याने आखणी करून गाळ्यांची रचना निर्धारित केली. प्रती विक्रेते २० हजार रुपये ना परतावा रक्कम आणि ७५ रुपये प्रतिदिन भाडे असा दर ठरविण्यात आला. परंतु, याला विक्रेत्यांनी विरोध केला.

अवश्य वाचा- अखेर तिने घातलीच आकाशाला गवसणी आणि केली यूपीएससी क्रॅक 
 

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपबीती कथन केली. त्यानंतर मनपाने १० हजार रुपये ना परतावा रक्कम आणि ३० रुपये प्रतिदिन भाडे घेण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार सुमारे १६२ विक्रेत्यांनी ही रक्कम मनपा प्रशासनाकडे जमा केली. परंतु, मनपाने अजूनही जागा वाटप करून ताबा पावती दिलेली नाही. 

अवश्य वाचा- कोरोनाला पळविण्यासाठी या जिल्ह्यांत झाले जनता कर्फ्यूचे पालन....
 

पावसाळ्यात कोहिनूर तलावातील चिखलात भाजी विक्री करताना मोठी अडचण येत आहे. परंतु, प्रशासनाकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने संतापलेल्या विक्रेत्यांनी स्वत: पुढाकार घेऊन गंजवॉर्डात भाजीबाजार भरविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महात्मा जोतिबा फुले भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष विनोद बुद्धावार यांनी दिली आहे. 
संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angry vegetable sellers will fill the market in Ganj Ward