औरंगाबाद ते नागपूर : एक चिंतन

अनिल यादव
बुधवार, 14 डिसेंबर 2016

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे  एका अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करून तिच्या शरीराची जी विटंबना करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबादमध्ये ९ ऑगस्टला मराठ्यांचा पहिला मोर्चा निघाला. आपण सुद्धा एकत्र येऊ शकतो,  हे मराठ्यांना समजले आणि त्यानंतर राज्यभरात मराठ्यांच्या मूक क्रांती मोर्चांना सुरूवात झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे  एका अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करून तिच्या शरीराची जी विटंबना करण्यात आली त्यामुळे संतप्त झालेला मराठा समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबादमध्ये ९ ऑगस्टला मराठ्यांचा पहिला मोर्चा निघाला. आपण सुद्धा एकत्र येऊ शकतो,  हे मराठ्यांना समजले आणि त्यानंतर राज्यभरात मराठ्यांच्या मूक क्रांती मोर्चांना सुरूवात झाली.

३२ जिल्ह्यांमध्ये विशाल संख्येने मोर्चे निघाले. हा जनसमुदाय शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरल्याने त्याच्या  संख्येवरच फार चर्चा झाली. नाहीतर मोर्चा  म्हणजे चक्‍काजाम, जाळपोळ, लुटालूट, मारहाण हे महाराष्ट्राने वारंवार अनुभवले आहे. मराठा-कुणबी मोर्च्यांच्यावेळी असे प्रकार घडले नसल्याने शासकीय पातळीवर मात्र शिथिलता आली आहे. ही धग थंड झाल्यांवर सर्वकाही सुरळीत होईल, अशा आशेत शासन आहे. खरे तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार फसले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय जरी घेतला तरी तो न्यायालयासमोर टिकाव धरू शकेल, असे ठोस पुरावे सादर केले नाहीत. याचा फटका त्यांना बसला. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी  राणा भिमदेवी थाटात कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण देणारच अशी आश्‍वासने प्रत्येक सभेत दिले आणि सत्ताही मिळविली. आता आपला शब्द युती सरकारला खरा करता आला नाही तर...

समाजाचे राज्याच्या लोकसंख्येतील प्रमाण ३२ टक्‍क्‍याच्या आसपास आहे. जोपर्यंत हा समाज शांत होता, सर्वकाही निमूटपणे सहन करीत होता तोपर्यंत सर्वकाही आलबेल होते. परंतु कोपर्डीच्या घटनेनंतर समाज रस्त्यावर उतरल्यानंतर सामाजिक विचारवंत, तत्ववेत्ते, राजकारण्यांच्या मतलबी लेखण्या हे आंदोलन कसे चुकीचे, सामाजिक संतुलन बिघडविणारे आहे हे पटवून देण्यासाठी झिजू लागल्या. बदलत्या जागतिकीकरणात आणि भांडवलशाहीत परंपरांगत वर्चस्व असणारे प्रस्थापित समूह अस्वस्थ होत आहेत, परंपरागत सामाजिक वर्चस्व गमावण्याच्या भितीमुळे मराठयांचे एकीकरण, असे शब्द वापरून मोर्चाचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण हाच समाज गेली सत्तर वर्षे वंचितांच्या उत्थानासाठी झगडतो आहे, हे मात्र सोयीस्करपणे विसरले जात आहे. मुस्लिमांसह अठरापगड जाती-जमातींचे एकीकरण करून स्वराज्य स्थापन करणारे शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, महर्षी विठठल रामजी शिंदे, जेथे-जवळकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील या शिल्पकारांचा वारसा या समाजाच्या पाठिशी आहे. असा समृद्ध वारसा असलेला समाज लाखोंच्या संख्येत रस्त्यावर का उतरतो हे समजून घेणे आवश्‍यक आहे.

मराठ्यांचे हे आंदोलन सामाजिक वर्चस्वासाठी नव्हे तर वर्तमान व्यवस्थेत येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य अंधकारमय आहे, याची जाणीव झाल्याने आणि या  पिढीला येणारी वंचितता टाळण्यासाठी आहे. खरे तर हा समाज निराशेच्या गर्तेत आहे. कोपर्डी येथील बलात्काराची घटना ही पुरूषी वर्चस्ववादातून घडली हे सत्य असले तरी त्या कोवळ्या मुलीच्या शरीरावर ज्या राक्षसी वृत्तीने अत्याचार केले, ते कुठल्याही संवेदनशील समाजाला पेटून उठायला लावणारे होते. त्यात कायदेशीर कारवाई करताना झालेली दिरंगाई आणि मूळ घटनेच्या आधी बळी पडलेल्या मुलीच्या नातेवाईकांविरूद्ध झालेल्या अॅट्रासिटी कायद्याच्या  दुरूपयोगामुळे आगीत तेल ओतले गेले. त्यामुळे या कायद्यातील जाचक असलेल्या कलमांमध्ये सुधारणा करा, अशी मागणी केली जात आहे, सरसकट रद्द करण्याची नाही. पण अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले काही बोलघेवडे राजकारणी, आरक्षण रद्द होणार, घटना बदलणार, अॅट्रासिटी कायदा रद्द होणार यासारख्या कंडया पिकवून राज्यातील सामाजिक सलोख्याला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.  मराठा हा उदार मानला जातो. तो स्वार्थी आणि पाताळयंत्री नाही. इतरांच्या मदतीला धावणारा समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. ८० टक्‍के मराठा समाज गरीब आहे. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अक्षम आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये या समाजाचे प्रमाण कमी आहे. शेतीचे प्रश्‍न आहेत.

काही मूठभर पुढारी श्रीमंत आहेत म्हणून  संपूर्ण समाज पुढारलेला असल्याचा शिक्‍का मारला गेला. त्यातून गेल्या ७० वर्षांत अनेक प्रश्‍न निर्माण झाले. कोपर्डी हे तर निमित्त ठरले. खरे तर ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न होता पण स्थानिक पोलिस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले, ते पाहूण मराठ्यांच्या मनात सरकारविरोधात मत तयार झाले. कुठल्याही क्रांतीकारी घटनेला निमित्त हवे असते. पर्वताच्या मुखातून ज्वालामुखी फुटावा आणि त्यातून अग्नीगोळ बाहेर पडावा तसे मराठ्यांचा भगवा तप्त लाव्हा बाहेर पडायला सुरवात झाली. हा लाव्हा तप्त पण शांत होता. तोंडावर बोटे, पण डोळयात अंगार आहे. आतापर्यंत अंकुशावर चालणारे हत्ती जागे झाले आणि शांतपणे मुलाबाळांसह चालू लागले. अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. लाखोंच्या संख्येने मराठा-कुणबी रस्त्यांवर उतरले. या मोर्चात सर्वच जातीबंधू होते. कुणबी, तेली, माळी, कुणबी, वंजारी, कोळी,धनगर यांसह मुस्लिमही सहभागी झाले. कुणीही नेता नाही, घोषणाबाजी नाही. कुणाच्या अंगालाही आतापर्यंत धक्‍का लागलेला नाही. यामुळे सरकार अस्वस्थ झाले. लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे शांत कसे हा प्रश्‍न  सरकारला भंडावून सोडतो आहे. कारण हे पहिल्या टप्प्यातील हे मोर्चे शांत असले तरी भविष्यात असेच असतील असे नाही, याची जाणीव सरकारलाही आहे.  

हे आंदोलन कोणतीही जात,धर्म अथवा कायद्याच्या विरोधात नाही.  अशाच प्रकारचे आंदोलन केवळ महाराष्ट्रात सुरू आहे असे नाही तर हरयाणातील जाट, गुजरातमधील पटेल, राजस्थानातील गुर्जर समाजही आरक्षणासाठी झगडत आहे. जात आपल्या समाजाचे वास्तव आहे. यासंदर्भात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे की, ‘‘जातीप्रश्‍नाला भिडल्याशिवाय या देशात क्रांती करता येणार नाही. तुम्ही कुठल्याही दिशेने जा, जातीचा राक्षस मार्गात आडवा आल्याशिवाय राहणार नाही.’’
समाजात अस्वस्थता आहे. हे मोर्चे राजकीय हेतून प्रेरित नाहीत. मराठा क्रांती मोर्चाचा प्रश्‍न धसास लावणे गरजेचे आहे. ‘थांबा आणि वाट पाहा’ चे धोरण सरकारने सोडायला हवे. आतापर्यंत हे मोर्चे शांततेने सुरू होते. लाखोंची गर्दी जमली असली तरी पोलिसांना काठीही वर उचलावी लागली नाही. पण ही वरवरची शांतता आहे. वादळ उठण्यापूर्वी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी कधी नव्हे एवढी अनुकूल  राजकीय परिस्थिती आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे.  एका समूहाचे सक्षमीकरण आणि त्याला सामाजिक संरक्षणाचे कवच प्रदान करीत असताना दुसऱ्या समुहाला मागास ठेवल्यास अथवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्यास  सामाजिक विकासाचे गणित सोडवित असताना येणारा हिशेब हा उणे असतो. तो अधिकाराकडे कसा न्यायचा, ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Yadav write about Maratha Kranti Morcha