esakal | Lockdown : जनावरांचे बाजार बंद असल्याने ऐन खरिपात शेतकऱ्यांना ही मोठी अडचण
sakal

बोलून बातमी शोधा

animal market.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचा लॉकडाऊन सुरू असल्याने शेती संबंधित अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Lockdown : जनावरांचे बाजार बंद असल्याने ऐन खरिपात शेतकऱ्यांना ही मोठी अडचण

sakal_logo
By
​विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विचार करता गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्वानाच त्याची झळ पोहचत आहे. उद्योग, व्यापार एवढेच काय शेती व्यवसायावरही त्याचे विपरीत परिणाम होत असून माल विकण्याच्या अडचणीसोबतच जनावरांची खरेदी विक्री त्यामुळे अडचणीत सापडली आहे.

जनावरांचे बाजार बंद असल्याने ऐन खरिपाच्या पूर्वसंध्येवर बैल मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकऱ्यांची सद्या मोठी पंचाईत झाली आहे. त्याकरिता शेतीमशागतीच्या कामांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात तरी सामाजिक अंतर राखत हे बैल बाजार सुरू करावेत अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचा लॉकडाऊन सुरू असल्याने शेती संबंधित अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतीचे कामे,दुग्धव्यवसाय व भाजीपालासंबंधी कामांना या लॉक डाऊनमध्ये सूट असली तरी डीझल, पेट्रोल मिळण्याच्या अडचणी येत असल्याने ट्रॅक्टरवरची शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. शेतमालाला त्याचा सर्वाधिक फटका बसला असून मातीमोल भावात हा माल शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. सोबतच जनावरांची खरेदी विक्री बंद असल्याने हा व्यापारही विस्कळीत झाला आहे. 

हेही वाचा - आनंदाची बातमी : आता टाळेबंदीतही म्हणा 'शुभमंगल सावधान'

दरवर्षी शेतकरी वर्ग हा पेरणीच्या मशागतींसाठी बैलांची अदलाबदल किंवा नवीन बैलजोडी खरेदी विक्री करण्यावर भर देत असतात.परंतु कोरोना संक्रमणाच्या पृष्ठभूमीवर हे जनावरांचे बाजार बंद पडले असल्याने खरेदी विक्रीला बाधा पोहोचली आहे. तसा बुलडाणा जिल्हा हा सध्या ऑरेंज झोनमध्ये असल्याने ठराविक ठिकाणी हे बैलाचे बाजार सामाजिक अंतरातून भरविण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी काही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

आवश्यक वाचा - स्वाभिमानीला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का?

बैलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध बाजारपेठा
जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात सर्वाधिक मोठा बैल बाजार मोताळा येथे भरत असून खामगाव व इतर तालुक्याच्या ठिकाणी हे बाजार भरत असले तरी जळगाव जिल्ह्यातील जामठी, नेरी, वरखेडीसारख्या बाजारातून चांगल्या बैल जोड्यांचे आदान प्रदान होत असते. मात्र जवळपास दोन महिन्यांपासून कोरोनामुळे हे सर्व बाजार विस्कळीत झाल्याने व्यापारीही शेतकऱ्यांजवळून बैल घेण्यास पुढे येत नसल्याने खरेदी विक्रीला बाधा पोहचली आहे.

खरिपातच करतात बैलजोडी खरेदीची तयारी
गेल्या काही दिवसांपासून यांत्रिक शेतीला प्राधान्य दिल्या गेल्याने बैलजोड्या वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यातच खरिपाचे काम आटोपले की बेलजोडी विकून पेरणीच्या वेळेस जोडी घेण्याची जणू स्पर्धाच झाली असल्याने मे व जून महिन्यात बैलजोड्यांना बाजारात एकच मागणी वाढत असते. यावर्षी कोरोनाने या खरेदी विक्रीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे.