
पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांचे हाल होतात. ताब्यात देण्यात आलेल्या 22 जनावरांपैकी सहांचा मृत्यू झाला. कोंडवाड्यातील जनावरे मोकळा श्वास कधी घेतील, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.
जिवती,(जि. चंद्रपूर) : नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आलेली जनावरे न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे पकडण्यात आलेली जनावरे कोंडवाड्यातच श्वास घेत आहेत. चारा, पाणी, आरोग्य व अस्वच्छतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरातील नागरिकांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. छत्र नसलेल्या कोंडवाड्यात जनावरांचा कोंडमारा होताना दिसत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांचे हाल होतात. ताब्यात देण्यात आलेल्या 22 जनावरांपैकी सहांचा मृत्यू झाला. कोंडवाड्यातील जनावरे मोकळा श्वास कधी घेतील, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाला पोलिसांनी अडविले. जनावरांचा जीव वाचला.
असं घडलंच कसं : नक्षलवाद्यांना पावसाळ्यात कोण करतात मदत...वाचा
तब्बल 22 जनावरे निर्दयीपणे भरून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही जनावरे नगरपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, जनावरांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले. त्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला. कोंडवाडा रक्षकाचे कुठलेही पद मंजूर नाही. नगरपंचायतीच्या सफाई कामगारांकडूनच जनावरांना चारा, पाण्याची सोय केली जाते.मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांची सोय करण्यास सफाई कामगारांना नाकीनऊ येणार आहे.
नगरपंचायतीकडे स्वतंत्र कोंडवाडा नाही. पर्यायाने कोंडवाडा रक्षकाचे पद नाही. गोवंशाचे हाल होत आहे. 22 पैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पोलिस प्रशासनातर्फे गोवंशाच्या निवासासाठी न्यायालयात पत्र व्यवहार करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईची तजवीज केली जाईल, असे प्रशासकीय अधिकारी वरद थोरात यांनी सांगितले.
गोरक्षण संस्थेशी आपण संपर्कात आहोत. त्यांच्याकडे गोवंश ठेवण्याची व्यवस्था नाही. जागा उपलब्ध होताच गोवंश सुरक्षित ठिकाणी हलविल्या जाईल.
विश्वास पुल्लरवार, सहायक पोलिस निरीक्षक जिवती.