
प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे या मातोश्री कुणावर कॉलेजमध्ये जात असताना तीन फेब्रुवारीला नंदोरी चौक समोर आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. यात अंकिता गंभीर जखमी होऊन नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांडाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सोमवारपासून (ता. ११) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरकारी पक्षाच्या वतीने तिघांची साक्ष नोंदविण्यात आली. उद्या आणखी काहींची साक्ष नोंदविण्यात येणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. आज हजर झालेल्या साक्षीदारांची उलट तपासणीही आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली.
आज सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाला. दुपारची अर्धा तासाची सुटी वगळता सायंकाळी सव्वा चार वाजेपर्यंत सलग या प्रकरणाचे कामकाज चालले. आज शवपरीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या श्रीमती देशमुख, मातोश्री कुणावार कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर आणि घटनास्थळावरील पंच सचिन बुटले या तिघांची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीदारांची उलटतपासणी आज आरोपीचे वकील ॲड. भूपेंद्र सोने घेतली.
विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
उद्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि आणखी काही साक्ष होण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अंकिता जळीत प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील ॲड. प्रसाद सोईतकर यांनी सहकार्य केले. या जळीतकांड प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव याही न्यायालयात उपस्थित होत्या.
प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे या मातोश्री कुणावर कॉलेजमध्ये जात असताना तीन फेब्रुवारीला नंदोरी चौक समोर आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. यात अंकिता गंभीर जखमी होऊन नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राचार्य डॉ. तुळसकर यांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पीडित प्राध्यापिकेला रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान तिने आरोपीचे नाव घेतले असल्याची साक्ष आज प्राचार्य डॉ. तुळसकर यांच्या वतीने नोंदविण्यात आली, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. आज न्यायालयात आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यालाही उभे करण्यात आले. न्यायालय परिसरात सुनावणी दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
संपादन - नीलेश डाखोरे