esakal | एकाचवेळी दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर, बाळाला दूध पाजून येताच क्षणार्धातच कळली मृत्यूची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

10 child from 10 villages died in bhandara fire incident

कमी वजनाचं बाळ असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होते. ती बरी होत असल्याने आता लेकीचं नाव ठेवण्याचा विचार वडिलांनी बोलून दाखवला, तर दर दिवसाला आई गीता बाळाला पाजण्यासाठी रुग्णालयात जात होती. बाळाला पाजून आल्यानंतर काही तासांमध्येच लेकीच्या मृत्यूची वार्ता आली.

एकाचवेळी दहा गावांमध्ये दुःखाचा महापूर, बाळाला दूध पाजून येताच क्षणार्धातच कळली मृत्यूची बातमी

sakal_logo
By
केवल जीवनतारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केअर युनिटमधील अग्निकाडांत विविध गावातील दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याने या गावांमध्ये दुःखाचा महापूर आला आहे. रुग्णालय प्रशासनाने काही तासांच्या आतच पालकांच्या हातात दोन ते तीन दिवसांच्या चिमुकल्यांचे शव दिले. हे शव घेऊन जाताना प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. या साऱ्या आई वडिलांनी गमावलेल्या नवजात शिशूंच्या वेदनांनी भरलेले दुःख सारखेच होते. 

हेही वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

एकाच वेळी दोन, तीन नव्हे तर दहा चिमुकल्यांचे शव पिवळसर कपड्यात लपेटून पालकांच्या स्वाधीन केले. हे दृश्य बघून येथील गर्दीच्या दुःखाचा बांध फुटला. मात्र, सारे पालक थरथरत्या हातात आपआपल्या चिमुकल्यांचे शव घेऊन विविध रुग्णवाहिकांमध्ये बसत असताना त्या पीडितांचा आक्रोशाने मन हेलावून गेले. रुग्णवाहिका नजरेआड होईपर्यंत रुग्णालय परिसरात जमलेल्या त्या गर्दीच्या नजरा दूर झाल्या नाही. भंडारा जिल्ह्यातील अग्निकांडात एक दिवसाच्या नवजात शिशूंपासून तर दीड-दोन महिन्याचे नवजात शिशू दाखल होते. भोजपूर टोली सोनझऱी वस्तीतील गीता विश्वनाथ बेहरे यांच्या दोन महिन्याच्या लेकीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. लेक बरी होत आहे, असे सांगण्यात आलं होतं. कमी वजनाचं बाळ असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होते. ती बरी होत असल्याने आता लेकीचं नाव ठेवण्याचा विचार वडिलांनी बोलून दाखवला, तर दर दिवसाला आई गीता बाळाला पाजण्यासाठी रुग्णालयात जात होती. बाळाला पाजून आल्यानंतर काही तासांमध्येच लेकीच्या मृत्यूची वार्ता आली. एकुलती एक लेकं दगावल्याने सारं कुटुंब शोकाकुल झालं. टोलीला भेट दिली असता, चिमुकलीच्या आई वडिलांना धीर देण्यासाठी गाव जमा झाला होता. वस्तीत स्मशान शांतता होती. येथील वातावरण निःशब्द होते. घरासमोर गर्दी होती, परंतु कोणीही एकमेकांशी संवाद साधत नव्हते. साऱ्यांच्या डोळे डबडबले होते. आई गीताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 

हेही वाचा - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन्...

हीच स्थिती साकोली जिल्ह्यातील उसगावात होती. येथील हिरकन्या हिरालाल भानारकर यांची काही दिवसांची मुलगी अग्निकांडात जळाली. श्रीनगर पहेला गावातील योगिता विकेश धुळसे यांचा मुलगाही जळाला. त्यांचेही पहिलेच बाळ होते. जांब तालुक्यातील मोहाडी गावातील प्रियंका जयंत बसेशंकर यांची मुलीसह गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीतील सुषमा पंढरी भंडारी यांची मुलगी, टाकला येथील दुर्गा विशाल रहांगडाले यांची मुलगी, उसरला येथील सुकेशिनी धर्मपाल आगरे यांची मुलगी, सितेसारा आलेसूर येथील कविता बारेलाल कुंभारे यांची मुलगी, रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांची मुलगी दगावली आहे. या दहा गावात रुग्णवाहिकेतून शव पोहोचवून देण्यात आले. 

हेही वाचा - Bhandara Hospital Fire News : ही आहेत मृत व बचावलेल्या बाळांच्या मातांची नावे

कचरापेटीत सापडलेला अनाथ जीव दगावला - 
ज्याचे कोणी नाही, त्याच्यावर कोणाची तरी सावली असते. म्हणूनच कचरापेटीत सापडलेल्या त्या अनाथ जीवाला कोणीतरी भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, नियतीने या अनाथ लेकराला जगू दिले नाही. त्याच्या जगण्यावरच घाव घातला. पहाटे दोन वाजता घडलेल्या अग्निकांडात होरपळून मृत्यू झाला. नऊ मुलींमध्ये हा एकमेव मुलगा होता. या मुलाच्या माता-पित्याचा शोध घेण्याचं काम येथील पोलिस यंत्रणा करीत होती. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत या चिमुकल्याची ओळख पटली नाही. यामुळे या चिमुकल्यांच्या मृत्यूची नोंद 'अज्ञात' म्हणून रुग्णालयाच्या नोंदवहीत केली आहे. चार दिवसांपूर्वी भंडारा शहरात एका उच्चभ्रूंच्या कॉलनीत जाणाऱ्या रोडवर एका युवकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कापडात गुंडाळलेला हा जीव दिसला होता. पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, या अनाथाचे आयुष्य औटघटकेचे ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.