प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नकोच, अंनिस करतेय जनजागृती

ganesh_idols.
ganesh_idols.

गडचिरोली : पर्यावरण रक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करीत मातीच्याच मूर्तीखरेदी करणे सुरू केले होते. त्यातच अचानक केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)मूर्तीवरील बंदी उठवित असल्याची घोषणा केली आणि लागलीच तीन-चार दिवसांत पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाने तत्काळ कृतिकार्यक्रम वृत्तपत्रातून प्रसिद्धही केला. त्यासाठी काही मूर्तीकारांनी आधीच पीओपी मूर्ती बनविलेल्या असल्याने त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार असून ते टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या निर्णयाला विरोध केला असून पीओपी मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तींवरच भर देण्यासाठी कुंभार समाजबांधवांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली.
यासंदर्भात महाराष्ट्र अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जगभर कोरोनाने कहर माजवला आहे. त्यामुळे प्रत्येक देशाला लॉकडाउन घोषित करावे लागले. त्याला भारत देखील अपवाद नव्हता. जीवनावश्‍यक गरजा भागविण्यासाठी केवळ काही मोजकी दुकाने चालू ठेवण्याची परवानगी होती. ज्यात औषध, किराणा सामान व अन्नधान्य दुकानांचा समावेश होता. असे असताना मूर्तीकारांना मूर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळालेच कसे हा प्रश्‍न आहे.
पाण्याच्या प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ते थांबवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन उभारले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. त्या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पाण्याचे प्रदूषण ज्यामुळे होते अशा ऑईलयुक्त रंगांनी रंगविलेल्या आणि पाण्यात न विरघळणाऱ्या पीओपीच्या मूर्ती बनविण्यावर व पाण्यात विसर्जित करण्यावर प्रतिबंध घातला. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे महाराष्ट्र अंनिसने म्हटले.
जिल्ह्यातील कुंभार समाजबांधवांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पीओपी मूर्तीऐवजी मातीच्याच मूर्ती बनविण्यावर भर देण्यात आला. तसेच भाविकांनी बाजारातून मूर्ती खरेदी करतानादेखील राष्ट्रहित जोपासण्यासाठी व प्रदुषण थांबविण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीचीच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले . बैठकीचे आयोजन करताना फिजिकल डिस्टंन्सिंगची खबरदारी घेण्यात आली.
या बैठकीत महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंभोरकर, विविध उपक्रम कार्यवाह तथा सर्पमित्र प्रा. विलास पारखी, कुंभार समाज संघटनेचे उपाध्यक्ष जोंधरू कपाटे, समाजातील मूर्तीकार दिलीप ठाकरे, भूषण कोटांगले, भोजराज ठाकरे, नीलकंठ कोटांगले, अनिल कोटांगले, आत्माराम कोटांगले, प्रवीण कपाटे , पुरुषोत्तम ठाकरे, विठ्ठलराव कोठारे, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. देवानंद कामडी आदी उपस्थित होते.

जनजागृतीची गरज....
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टंन्सिंगची ऐसीतैसी होऊ नये म्हणून सार्वजनिक उत्सवस्थळी मूर्ती मांडणाऱ्या संघटनांना व मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना मूर्तीच्या उंचीबाबत वर्तमानपत्रातून योग्य ती माहिती आताच प्रसारित करून जनजागृती करावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com