अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आज घेणार विदर्भाचा निरोप; पुढील मु.पो. सोलापूर!

योगेश बरवड 
Sunday, 11 October 2020

अनेक वर्षे विदर्भातील जंगलाशी नाते जपून विविध ग्रंथांच्या रूपाने त्याचा भव्य ठेवा निर्माण करणारे अरण्यऋषी आज, रविवारी विदर्भाचा कायमचा निरोप घेत असून पुढील आयुष्य ते आपल्या जन्मागावी सोलापूर येथे पुतण्याकडे व्यतित करणार आहेत.

नागपूर : विदर्भ हा अस्सल निसर्गसंपन्न प्रदेश... गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा असो की, मेळघाट... येथील निसर्गवैभवाला जगात तोड नाही. पण मला चिंता वाटते आहे. इंग्रजांनीही केली नाही एवढी निसर्गाची नासधूस सध्या सुरू आहे. विकासाच्या नावावर अक्षरशः निसर्गाला ओरबडणे सुरू आहे. भविष्यातील मानवी जीवन वाचविण्यासाठी हे जीवनदायी जंगल वाचविण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांची आहे, असे भावनिक आवाहन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी निरोपाच्या सत्कारप्रसंगी केले.

अनेक वर्षे विदर्भातील जंगलाशी नाते जपून विविध ग्रंथांच्या रूपाने त्याचा भव्य ठेवा निर्माण करणारे अरण्यऋषी आज, रविवारी विदर्भाचा कायमचा निरोप घेत असून पुढील आयुष्य ते आपल्या जन्मागावी सोलापूर येथे पुतण्याकडे व्यतित करणार आहेत. विदर्भातील वनांच्या अभ्यासात आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालवित या मूळ तेलगू भाषिक निसर्गऋषीने मराठीला लाखावर नवे शब्दमोती दिले. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

ते विदर्भाचा निरोप घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शेवाळकर कुटूंबीयांनी विदर्भवासीयांच्या वतीने हृदय सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

यावेळी चितमपल्ली यांनी विदर्भातील संशोधनविषयक बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. पक्षी, वन्यप्राणी, वनस्पती यावरील लिखाण असा विविधांगी आठवणींचा पट त्यांनी उलगडला. नागझिरा येथील वनसंपत्तीने मोहिनी घाल्यावरच आपल्या लेखनाला नवे वळण मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

या प्रसंगी चितमपल्ली यांचे पुतणे व कुटुंबातील सदस्य, आशुतोष शेवाळकर, विजया शेवाळकर, मनिषा शेवाळकर, माहिती विभागाचे संचालक हेमराज बागूल, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आणि अन्य निवडक मान्यवरांची उपस्थिती होती.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aranyarushi Maruti chitampali will now stay at solapur shifted from vidarbha