महात्मा गांधीची १५० वी जयंती आठवड्यावर आणि सर्व सेवा संघाचा वाद पोलिसात

रुपेश खैरी
Friday, 25 September 2020

सर्व सेवा संघ या महात्मा गांधी यांच्या अनुयायांच्या मातृसंस्थेकडून संपूर्ण देशात गांधीवादाची चळवळ चालते. पण, गत काही दिवसांपासून सर्व सेवा संघालाच ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. भूदान घोटाळा आणि मालमत्ता हडपण्याच्या प्रकारावरून अनेकदा गांधीवाद्यांमध्ये भडका उडाला आहे.

वर्धा : महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीला आठवडा शिल्लक आहे आणि देशात सर्वोदयाचा विचार देणाऱ्या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून चांगलाच वादंग उठला आहे. हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.

अध्यक्षपदाची मुदत वाढवून ती डिसेंबर २०२० करण्यात आली असताना अचानक सदस्यांच्या ऑनलाइन बैठकीत अध्यक्ष महादेव विद्रोही यांना हटविण्यात आल्याचा निर्णय झाला. पण, महादेव विद्रोही यांनी ही कारवाई असंवैधानिक असल्याचा आरोप केला आहे. कुठलेही अधिकार नसताना आपल्या विरोधकांनी कुरघोडी केल्याचा आरोप विद्रोही यांनी केला आहे. यावरून महादेव विद्रोही आणि सदस्य अविनाश काकडे यांनी सेवाग्राम पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

सर्व सेवा संघ या महात्मा गांधी यांच्या अनुयायांच्या मातृसंस्थेकडून संपूर्ण देशात गांधीवादाची चळवळ चालते. पण, गत काही दिवसांपासून सर्व सेवा संघालाच ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. भूदान घोटाळा आणि मालमत्ता हडपण्याच्या प्रकारावरून अनेकदा गांधीवाद्यांमध्ये भडका उडाला आहे.

महादेव विद्रोही यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२० रोजी समाप्त झाला आहे. कोरोना संकटामुळे कार्यकाळ ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. सर्व सेवा संघाच्या घटनेतील तरतुदींनुसार निवडणूक बोलावणे आणि बैठक बोलविण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. पण अचानक ऑनलाइन बैठक बोलावण्यात आली. त्यामुळे या बैठकीवरच महादेव विद्रोही यांनी आक्षेप घेतला आहे.

पोलिसात परस्परविरोधी तक्रारी
महादेव विद्रोही सेवाग्राम येथे पोहोचल्यावर मात्र कार्यालयाची जबाबदारी घेतलेल्या अविनाश काकडे यांनी कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे विद्रोही यांना कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विद्रोही येतील आणि गोंधळ घालतील अशा प्रकारची तक्रार काकडे यांच्यातर्फे सेवाग्राम पोलिसात करण्यात आली आहे. तर त्याला महादेव विद्रोही यांच्यातर्फे अध्यक्ष पदावरून हटविण्याचा प्रकार गैरकायदेशीर आहे. त्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.

धर्मदाय आयुक्‍तांकडे जाण्याचा सल्ला
महादेव विद्रोही यांना सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून निष्कासित करण्यात आले असून ते कार्यालयात काही गोंधळ घालण्याची शक्‍यता असल्याची तक्रार कार्यालय व्यवस्थापक अविनाश काकडे यांनी केली. तर महादेव विद्रोही यांनी त्यांना पदावरून कमी करण्याचा प्रकार हा गैरकायदेशीर असल्याची तक्रार दाखल केली आहे. दोन्ही पक्षांना पोलिसांनी धर्मदाय आयुक्‍त किंवा इतर कोण्या सक्षम अधिकाऱ्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
कांचन पांडे
ठाणेदार, सेवाग्राम

असा प्रकार पहिल्यांदा
महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित असलेल्या संघटनेत असा प्रकार पहिल्यांदा घडला. गैरप्रकार करीत अध्यक्षपदावरून निष्कासित करणे आणि कधी नव्हे ते कार्यालयाला कुलूप लावणे हा प्रकार पहिल्यांदाच घडला.
महादेव विद्रोही
सर्व सेवा संघ, सेवाग्राम

सविस्तर वाचा - शहिद नरेश बडोले अनंतात विलीन, शहिद बडोले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पोलिसांत तक्रार दाखल
सर्व सेवा संघाच्या समितीने महादेव विद्रोही यांच्या मनमर्जी कारभाराला लगाम लावत त्यांना अध्यक्षपदावरून निष्कासित केले. नवे अध्यक्ष म्हणून चंदन पाल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. हा सर्वप्रकार सर्वसंमतीने झाला आहे. कार्यालयातील कागदपत्रांची कुठलीही नासधूस होणार नाही याची काळजी घेत कार्यालयाला कुलूप लावले. शिवाय या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अविनाश काकडे
कार्यालय व्यवस्थापक, सर्वसेवा संघ सेवाग्राम

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argument in Sarv seva sangh