esakal | ठार मारण्याची धमकी देऊन सशस्त्र युवकांनी पळविला वनकार्यालयातील ट्रॅक्‍टर
sakal

बोलून बातमी शोधा

Tractor

थिपे यांच्यासह तातडीने क्षेत्र सहायक नरेश भोवरे, वनरक्षक पिंपळकर, टेकाम, सुरवसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर एमएच ३४ एल ९४६८ क्रमांकाच्या ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरत असल्याचे आढळून आले.

ठार मारण्याची धमकी देऊन सशस्त्र युवकांनी पळविला वनकार्यालयातील ट्रॅक्‍टर

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून वाळूतस्करी सुरू होती. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर जप्त केले. काही वेळातच चार-पाच दुचाकीने काही युवक आले. या युवकांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जप्त केलेला ट्रॅक्‍टर पळवून नेला. ही घटना बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९४ मध्ये २५ सप्टेंबरला घडली. याप्रकरणी रूपेश मोरे, मनोज क्षीरसागर या दोघांविरुद्ध वन कायद्याअंतर्गत आणि बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाळूघाट बंद आहेत. त्यामुळे वाळूतस्करांकडून अव्वाच्या सव्वा किमतीत वाळूची विक्री केली जात आहे. वाळूतस्कर रात्रीच्या सुमारास अधिकाऱ्यांची नजर चुकवून वाळूतस्करी करीत आहेत. बल्लारपुरातील काही तस्करांनी आपला मोर्चा वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या नाल्यांकडे वळविला आहे. २५ सप्टेंबरला कक्ष क्रमांक ४९४ अंतर्गत येत असलेल्या नाल्यातून वाळूतस्करी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांना मिळाली. 

थिपे यांच्यासह तातडीने क्षेत्र सहायक नरेश भोवरे, वनरक्षक पिंपळकर, टेकाम, सुरवसे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर एमएच ३४ एल ९४६८ क्रमांकाच्या ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरत असल्याचे आढळून आले. यावेळी वनाधिकाऱ्यांनी अवैधरीत्या वाळूतस्करी करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई केली. याबाबतची माहिती वाळूतस्करांनी आपल्या साथीदारांना दिली.

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना
 

त्यानंतर चार-पाच दुचाकी वाहनाने युवक जंगलात आले. यातील दोघांनी आपली नावे रूपेश मोरे, मनोज क्षीरसागर अशी सांगितली. या युवकांनी जप्त केलेली ट्रॅक्‍टर सोडा, अन्यथा जिवानिशी ठार मारू, अशी धारदार शस्त्र दाखवीत धमकी दिली. वनाधिकाऱ्यांनी प्रसंगावधान साधत प्रतिकार केला नाही. याचा फयदा घेत युवकांनी वनविभागाच्या ताब्यातील ट्रॅक्‍टर घेऊन पळ काढला.

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाला शेततळ्यात बुडवले

या घटनेनंतर रूपेश मोरे, मनोज क्षीरसागर या दोघांच्याविरुद्ध वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बल्लारपूर पोलिस ठाण्यात शासकीय संपत्तीची चोरी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक भगत करीत आहेत. तर, वनगुन्ह्याचा तपास मध्य चांदाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे करीत आहेत.

संपादन ः राजेंद्र मारोटकर