मेळघाटात नेमका कशामुळे पेटला वाद ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अटकेतील पाचही जणांना वनविभागाने अचलपूर न्यायालयासमोर हजर केले असता परिसरात बऱ्याच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मुलांवर कारवाईमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

चिखलदरा : मेळघाटात स्थानिक व व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत होणारा संघर्ष वाढला आहे. जंगलात कुत्री, कुऱ्हाडी घेऊन जाणाऱ्यांना कॅमेरा ट्रॅपने टिपल्यामुळे त्यातील पाच जणांवर वनविभागाने गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर हा नवीन वाद सुरू झाला.

चिखलदरा तालुक्‍यात सलोना गावातील हे सर्व युवक आहेत. व्याघ्रप्रकल्पातील राखीव जंगलात घटांग वन्यजीव परिक्षेत्रातील 54-55 या खंडात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये हे पाच जण दिसले. नीतेश शिवलाल कांदेकर (वय,23), सागर पुनाजी मोरे (20), नीतेश पतिराम बेलसरे (21), रितेश पतिराम बेलसरे (19), जयपाल राजाराम कासदेकर (22) अशी अटकेतील पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियम 1972 नुसार कारवाई करण्यात आली. अटकेतील पाचही जणांना वनविभागाने सोमवारी (ता. 29) अचलपूर न्यायालयासमोर हजर केले असता परिसरात बऱ्याच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मुलांवर कारवाईमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पालकांनी परतवाडा येथील कार्यालयात गर्दी केली होती.

वाचा - 50 मिनिटे चालला जीवन-मृत्यूचा संघर्ष, अखेर तो जिंकला...

काही दिवसांपूर्वी कॅमेरा ट्रॅपमध्ये पाचही युवक दिसत असले तरी त्यांच्यावर गुन्हा करण्याचे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हा दाखल करू नये. व्याघ्र प्रकल्पाकडे पुरावा असेल तरच कारवाई करावी. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वनमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा केल्या जाईल.
 राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट.

सोमवारी  सलोना येथून पाच जणांना अटक केली. कॅमेरा ट्रॅपमध्ये ते दिसतात. त्यांच्याविरुद्ध वनविभागाने कायदेशीर कारवाई केली. राखीव जंगलात शस्त्रे घेऊन फिरणे चुकीचे आहे. त्या सर्वांची चौकशी केल्या जाईल. त्यानंतरच ठोस कारण पुढे येईल.
 ए. के. जोशी, घटांग वनपरिक्षेत्र अधिकारी, मेळघाट.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrest of five people sparked controversy in Melghat