आर्वी : अस्थायी बेटाची दूधदुभत्याला संजीवनी;120 म्हशी ठेवल्या मुक्कामी

राजेश सोळंकी
शनिवार, 15 जून 2019

आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेले बेट चार कल्पक युवकांच्या दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देणारे ठरले आहे. या युवकांनी स्वमालकीच्या 120 म्हशींना धरणाच्या पात्रातून पोहत बेटावर नेले. हे युवक नावेने बेटावर जातात आणि दूधसंकलन करून त्याचे परिसरात वाटप करतात. या व्यवसायाकरिता त्यांनी खास नाव विकत घेतली आहे. या युवकांची कल्पकता आणि धाडसाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे व भारत मानकर रा. बोरगाव (हातला) अशी या युवकांची नावे आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, म्हशी आहेत; पण चारा नाही. तालुक्‍यात वैरणाची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे गुराढोरांचे काय करायचे, असा प्रश्‍न गोपालक, शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला. यावर उपाय शोधत या चार युवकांनी निम्न वर्धा धरणात निर्माण झालेल्या बेटाची निवड केली. तिथे 120 म्हशी नेऊन त्यांच्यासाठी नैसर्गिक सकस आहाराची सोय केली. नियोजनानुसार त्यांनी नावेला बांधून काही म्हशी तिथे नेल्या. उर्वरित म्हशी पाण्यात सोडून त्यांच्या मागे पोहत-पोहत बेटावर नेल्या. म्हशींना मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झाला, पाण्याचाही प्रश्‍न मिटला; मात्र तेथे राहण्याचा, राखण करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. म्हशी परत तेथून पाण्यात येऊ शकत नसल्याने त्यांची राखण करण्याची काळजी मिटली. त्यानंतर दररोज सकाळ, संध्याकाळ पोहत बेटावर जाणे, दूध काढणे, ते आणणे या कामांचे आव्हान उभे ठाकले. या युवकांनी एक नाव विकत घेतली. नाव कशी व्हलवायची हे शिकून घेतले. आता हे युवक सकाळी साडेपाच वाजता गावातून दुचाकीने किनाऱ्यावर येतात. त्यांना नावेने बेटावर जाण्यास एक तास लागतो. बेटावर गेल्यावर म्हशीचे दूध काढतात. दररोज सुमारे 100 लिटर दूध संकलित होते. म्हशींना हिरवा चारा मिळत असल्याने दूध चांगल्या प्रतीचे असते.
गरजेतून शोध
तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणाने 24 गावे उजाड झाली. अडीचहजार हेक्‍टरमध्ये हे धरण आहे. त्यात पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र पाणी आटताच तिथे हिरवीगार बेटे तयार झाली. 25-25 एकरांचे हे दोन बेटे असून, आजूबाजूला पूर्ण पाणी आहे; नांदुरा (काळे) गावापासून सात किमीवर हे बेट आहे. उन्हाळ्यात चाऱ्याच्या शोधात असताना संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडरे, भारत मानकर यांना हे बेट गवसले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvi: Sanjivani for the temporary island milk dairy production; 120 buffaloes kept