फटाके कोणाला, फोडणार कोण?

फटाके कोणाला, फोडणार कोण?

नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असल्याने उद्या गुरुवारी फटाके कोण फोडणार आणि फटके कुणाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण राज्याची नजर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाकडे राहणार आहे. 
दक्षिण-पश्‍चिममधून फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनी लढा दिला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना एक लाखांच्या मताधिक्‍यांची दिवाळी भेट देण्याचा संकल्प केला आहे. दुसरीकडे देशमुख यांनीही आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. येथून जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार यांच्यासह एकूण 20 उमेदवार रिंगणात होते. दक्षिण नागपूर बंडखोरीमुळे सर्वाधिक चर्चेत आले होते. भाजपचे मोहन मते आणि कॉंग्रेसच्या गिरीश पांडव या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला. शिवसेनेचे किशोर कुमेरिया, भाजपचे सतीश होले आणि कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे हे किती आणि कोणाचे मते आपल्याकडे वळवतात यावर दोघांचेही भवितव्य अवलंबून आहे. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे आणि कॉंग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्यात सामना झाला. हजारे हे चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक आहे. त्यामुळे खोपडे आणि चतुर्वेदी यांच्यातच प्रामुख्याने येथे लढत झाली. त्यामुळे पूर्वमध्ये दोघांच्याही वर्चस्वाची लढाई आहे. खोपडे विजयाची हॅटट्रिक करण्यास सज्ज झाले आहेत. पश्‍चिम नागपूरमध्ये अतिशय अटीतटीची लढाई झाली. भाजपचे उमेदवार आमदार सुधाकर देशमुख आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यातच प्रामुख्याने रंगलेला अंतिम सामना कोण जिंकतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि हलबा समाजात वर्चस्वाची लाढाई झाली आहे. कॉंग्रेसने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नसल्याने येथे मतदानाच्या दिवशी नाराजी बघायला मिळाली. कॉंग्रेसच्या बंटी शेळके यांनी स्वबळावर येथे लढा दिला आहे. 
मात्र, भाजपच्या कडव्या विरोधकांमुळे त्यांनी नेमके कोणाला मत दिले हे निकालाअंती उघड होणार आहे. भाजपने जातीय समीकरण राखत हलबा समाजाचे आमदार विकास कुंभारे यांनाच उमेदवारी देऊन अर्धी लढाई आधीच जिंकली आहे. कॉंग्रेसला सर्वाधिक आशा उत्तर नागपूरमधून आहे. माजी मंत्री व कॉंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी यावेळी आपले सर्वस्व पणाला लावले आहेत. प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उघड भूमिका टाळल्याने नेमके चित्र उद्याच स्पष्ट होईल. बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्या हत्तीच्या चालीवरच येथे सर्वकाही अवलंबून आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मिलिंद माने यांच्या विजयासाठी साम-दामचा वापर करून चोख बंदोबस्त केला होता. त्यामुळे निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com