एटीएम क्‍लोनिंगचा म्होरक्‍या गजाआड; तपास पथकाने एकाला मुंबई येथून घेतले ताब्यात

टीम ई सकाळ
Tuesday, 5 January 2021

मुंबईला गेलेल्या पथकाने तपासात या गुन्ह्यात सहभागी असलेला बॅंक कर्मचारी रणधीरकुमार सिंग याला ताब्यात घेऊन भंडारा येथे आणले. कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले. नंतर त्याला अटक करण्यात आली.

भंडारा : एटीएमचे क्‍लोनिंग कार्ड बनवून बॅंक खात्यातील एक लाख ३४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना २४ डिसेंबरला घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने म्होरक्‍याला गजाआड केले आहे.

शहरात २४ डिसेंबरला दोन एटीएम सेंटरमधून चोरट्यांनी पैसे काढले होते. त्याबाबत सायबर सेल सीसीटीव्ही फुटेजचे विश्‍लेषण करताना तीन ते चार आरोपी एटीएममध्ये छेडछाड करताना आढळले. तसेच त्यांच्याकडे सदर खात्याची बॅंकेतून मिळालेली माहिती होती. परंतु, त्यांच्या तोंडावर मास्क असल्याने ओळख पटविणे अवघड झाले.

यातील आरोपींबाबत पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवली तेव्हा ते मुंबई आणि झारखंड राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दोन वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना केली.

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

मुंबईला गेलेल्या पथकाने तपासात या गुन्ह्यात सहभागी असलेला बॅंक कर्मचारी रणधीरकुमार सिंग याला ताब्यात घेऊन भंडारा येथे आणले. कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले. नंतर त्याला अटक करण्यात आली.

तसेच झारखंड येथील आरोपींच्या शोधात गेलेल्या पथकाला आरोपी मिळाले नाही. परंतु, त्यांच्या घरच्या झडतीत गुन्ह्याशी संबंधित क्‍लोनिंग एटीएम कार्ड व साहित्य मिळाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, लोकेश कानसे, सुधाकर चव्हाण, नारायण तुरकुंडे, श्रीराम लांबाडे, भूषण पवार आदींनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM breaker arrested in Bhandara district