धक्कादायक! एटीएम ठरताहेत कोरोना संसर्गाची केंद्रे

सुरेंद्र चापोरकर
Thursday, 27 August 2020

मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे खबरदारीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सावली (जि. अमरावती) : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते आहे. सॅनिटायझरचा नियमित वापर केला जातो आहे. हे सर्व नियम बॅंकेतही बघायला मिळतात. मात्र, याच बॅंकांनी शहराच्या चौकाचौकात सुरू केलेल्या एटीएममध्ये मात्र कुठल्याही सुविधा नाहीत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. त्यामुळे एटीएम ही कोरोना संसर्ग वाढण्याची केंद्रे ठरू शकतात, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे. शहरातील काही एटीएम केंद्रांचा अपवाद वगळता अनेक एटीएममध्ये सुरक्षारक्षक नाही. ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सुविधा नसल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

मागील काही दिवसांपासून शहरासह तालुक्‍यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे खबरदारीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही सुरक्षा बाळगत आहे. मात्र, दररोज हजारो ग्राहकांचा स्पर्श होणाऱ्या एटीएम केंद्राचे काय, असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रात सुरक्षा दिसत नाही. अपवाद म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डजवळील बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएममध्ये दिवसभर ग्राहक ये-जा करीत असतात. येथून अनेकजण पैसे काढून निघून जातात. काही ग्राहक तर साधा मास्कसुद्धा लावत नाही. येथे सुरक्षारक्षक नसल्याने सोशल डिस्टन्टिंगचा नियमही धाब्यावर बसवला जात आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास एटीएम केंद्रातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सविस्तर वाचा - ऐकावे ते नवलच! खुद्द गावच्या उपसरपंचावरच भ्रष्ट्राचाराचे आरोप

अनेक एटीएम केंद्रात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो आहे. पैसे काढल्यास काही ग्राहक तिथेच स्लीप फेकून देतात. अनेक केंद्रामध्ये धूळ साचली आहे. देखरेखीकडे बहुतांश बॅंक व्यवस्थापनांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र, बॅंकांना ना कुणाची भीती, ना नागरिकांच्या आरोग्याची काळजी असेच काहीसे चित्र यातून स्पष्ट होते. सावली हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. शहरात शासकीय व निमशासकीय बॅंका असून, तीन एटीएम आहेत. यातील एक एटीएम केंद्र तीन महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन्ही एटीएममध्ये कोरोना संसर्गाच्या काळापासून सॅनिटयझरची सुविधा नाही. सुरक्षारक्षक नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात आहे. या'सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये बॅंकांप्रती संताप व्यक्त होत आहे.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM Centers are center of corona Infection