पाटणसावंगीमधून एटीएमची चोरी; कॅमेरे व रेकॉर्डरही पळून नेले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील संपूर्ण मशीनच लंपास केली असल्याने दरोडेखोरांची मोठी टोळी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे पाटणसावंगी परिसरात खळबळ उडाली आहे.

पाटणसावंगी, (जि. नागपूर) :   येथील "पाटको स्पिन' सूतगिरणीलगत असलेली इंडियन ओव्हरसिज बॅंकेचे एटीएम गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. एटीएममधून सुमारे 2 लाख 83 हजार 600 रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती पाटणसावंगी पोलिसांनी दिली आहे. 

सावनेर येथील बॅंकेचे व्यवस्थापक अंशुमन झा यांनी पाटणसावंगी पोलिस चौकीत याबाबतची तक्रार केली आहे. चोरट्यांनी एटीएम सेंटरमधील संपूर्ण मशीनच लंपास केली असल्याने दरोडेखोरांची मोठी टोळी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे पाटणसावंगी परिसरात खळबळ उडाली आहे. पाटणसावंगीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत पुरेकर व इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली. 

कॅमेरे, रेकॉर्डर पळवून नेले

त्यावेळी बॅंकेचे व्यवस्थापक अंशुमन झा, सुरक्षा अधिकारी अनुज कुमार, एटीएम मशीन ईपीएस कंपनीचे क्षेत्र अधिकारी जितेंद्र बसाखेत्रे उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा करून तपास चालू केला. एटीएम मशीनच्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी तोडफोड केली. कॅमेरे, रेकॉर्डर पळवून नेले. यामुळे चोरटे कोण याचा शोध लावणे पोलिसांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ मुख्य रस्त्यावर आहे. चोरीची घटना पाटणसावंगी पोलिस स्टेशनपासून जवळच आहे. 

मशीन गाडीत भरून केला पोबारा

शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम सबलीने काढली. नंतर मशीन गाडीत भरून चोरांनी मशीनसह पोबारा केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून तसे पुरावे मिळाले आहेत. संबंधित घटनेचा तपास पाटणसावंगी पोलिस संदीप नागरे, हेमराज कोल्हे व कुणाल कवडे करीत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM theft from Patanaswangi