
मृत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याची शक्यता वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केली. बिबट्याला जंगलात एका ठिकाणी विषबाधा झाली. त्यानंतर तो गतप्राण झाला की नाही, याची शहानिशा करण्यासाठी त्याचा चेहरा आणि शरीरावर कुऱ्हाडीने तीन वार केल्याचे दिसून आले.
अमरावती : वरुड तालुक्यात मध्यप्रदेश सीमेलगत महेंद्री गावातील जंगलात बिबट्याचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यामुळे बिबट्याचे काही दातही घटनास्थळी पडून होते.
मंगळवारी (ता.22) ही घटना उघडकीस आली. मृत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याची शक्यता वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केली. बिबट्याला जंगलात एका ठिकाणी विषबाधा झाली. त्यानंतर तो गतप्राण झाला की नाही, याची शहानिशा करण्यासाठी त्याचा चेहरा आणि शरीरावर कुऱ्हाडीने तीन वार केल्याचे दिसून आले. एके ठिकाणी मारले आणि दुसऱ्या ठिकाणी काही दूर अंतरावर बिबट्याचा मृतदेह आणून टाकल्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर वनविभागाच्या चमूने महेंद्री येथील ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या चमूने परिसराला भेट दिली. बुधवारी (ता. 23) मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जंगलातच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. काही वर्षांपूर्वी महेंद्री जंगलाला अभयारण्य घोषित करावे, असा प्रस्ताव वनविभागाने राज्य शासनाकडे पाठविला होता.
त्यावर प्रस्तावित अभयारण्य करावे, याबाबत चर्चाही झाली. परंतु अभयारण्य घोषित करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. शासनाने कन्झर्व्हेशन रिझर्व्ह या नावाखाली जंगल सुरक्षित असल्याचे जाहीर केले. परंतु त्यातून अभयारण्यासारखी सुरक्षितता होऊ शकत नाही. व्याघ्रप्रकल्पाचे निकष लागत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता पूर्णपणे करणे शक्य नसल्याचे मत या घटनेनंतर वन्यजीवतज्ज्ञांनी व्यक्त केले.
काही अवयव तपासणीसाठी पाठविणार
मृतदेह कुजलेला असून, अळ्याही पडल्याचे दिसले. शरीराचे काही भाग गळले. ही घटना अडीच दिवसांपूर्वीची असू शकते. मृत बिबट्याच्या शरीरावर जखमा आहेत. शवविच्छेदनानंतर विबट्याचे काही अवयव तपासणीसाठी पाठविण्यात येतील.
-लीना आडे, एसीफ, वनविभाग, अमरावती.
संपादन : अतुल मांगे