जादूटोण्याचा संशय : तुझ्याच घरी महिला कशी बेशुद्ध पडते, असे विचारत चौघांवर टाकले पेट्रोल, माचीस पेटवली तेवढ्यात... 

गणेश बर्वे 
Sunday, 26 July 2020

गावातील 25 वर्षीय महिला 17 जुलैला कुंदन गोपाले यांच्या घरी पोहोचली आणि त्याच्या छपरावर बेशुद्ध पडली. यावरून गावात मोठा वादंग झाला. संपूर्ण गावात एवढ्या जणांकडे गेली, पण तुझ्याच घरी कशी काय बेशुद्ध पडली, असा प्रश्‍न विचारून कुंदन याच्यावर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला.

तुमसर (जि. भंडारा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावातील काही लोकांनी चार व्यक्तींना मारहाण करून त्यांच्या अंगावर रॉकेल आणि पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने पोलिस वेळेवर पोहचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना तुमसर येथून 22 किलोमीटर अंतरावरील राजापूर गावात घडली. याप्रकरणी 24 आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकारामुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील 25 वर्षीय महिला 17 जुलैला कुंदन गोपाले यांच्या घरी पोहोचली आणि त्याच्या छपरावर बेशुद्ध पडली. यावरून गावात मोठा वादंग झाला. संपूर्ण गावात एवढ्या जणांकडे गेली, पण तुझ्याच घरी कशी काय बेशुद्ध पडली, असा प्रश्‍न विचारून कुंदन याच्यावर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला. या घटनेची दखल तंटामुक्त समितीने घेतली आणि चर्चा सुरू झाल्या. त्यावर सामंजस्य घडविण्यात आले. त्यादिवशी प्रकरण शांत झाला दोघांमध्ये विवाद संपला. 

अधिक माहितीसाठी -कधी प्रश्‍न पडला का? सौभाग्याचे लक्षण असलेल्या बांगड्या महिला का घालतात, हे आहे उत्तर अन्‌ फायदे...
 

असे फूटले वादाला तोंड 

 

शनिवार, 25 जुलै रोजी 25 वर्षीय महिला कुंदन गोपाले आणि ओमप्रकाश मेश्राम यांच्या घरी पुन्हा गेली आणि पुन्हा त्याच्या घराच्या आवारात बेशुद्ध पडली. यावरून ती तुमच्याच घरीच वारंवार बेशुद्ध का पडते, असा प्रश्‍न महिलेच्या कुटुंबीयांनी विचारला. यावर वाद झाला तुम्ही या महिलेवर जादूटोणा केला असा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी केला. यावरून वादाला तोंड फूटले. यात कुंदन भोजराम गोपाल (वय 40) ओमप्रकाश मेश्राम (वय 27), कचरू फत्तू राऊत (वय 60), मनोहर बळीराम गोटे (वय 70) हे राजापूर येथील रहिवासी असूनही भीतीपोटी रात्री उशिरापर्यंत ते गावात आले नाही. त्यामुळे गावांमध्ये यांच्याविरुद्ध आक्रोश निर्माण झाला. जवळपास 300 ते 400 लोक गोळा होऊन याच्या घरावर धावून गेले आणि घरच्या लोकांना धमकी दिली जर तुम्ही या चौघांनाही गावात आणले नाही तर आम्ही तुम्हाला मारझोड करू. शेवटी नाइलाजाने हे चौघेही भीतीपोटी गावामध्ये रात्री बारानंतर आले. 

24 जणांविरुद्ध गुन्हा 

संतप्त जमावाने चौघांचेही कपडे काढून त्यांच्या कपड्यांवर पेट्रोल टाकून जाळले. त्यांना नग्न अवस्थेत लाथाबुक्‍क्‍यांनी लाठ्या-काठ्यांनी मारझोड केली. गंभीर जखमी झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल आणि रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांची गाडी आल्यामुळे बेत फसला आणि मोठी दुर्घटना टळली. पोलिस त्यांना आपल्या गाडीत घेऊन गेले. गोपाल आणि ओमप्रकाश मेश्राम यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चौघांच्या तक्रारीवरून 24 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले. 

गावात भीतीचे वातावरण 

पोलिस निरीक्षक मस्कर यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी बिसेन यांच्या मार्गदर्शनात घटनेची चौकशी करून योगेश चोपकर 27, देवा चोपकर 35, रवी राऊत 45, महेंद्र राऊत 40, अविनाश मेश्राम 27, मच्छिंद्र पर्वते 36, निरंजन पर्वते 38, सुखदेव पर्वते 33, राजकुमार माडे 26, राजेंद्र गुजर 35, प्रतीक मरकाम 45, प्रवीण पर्वते 30, विशाल मेश्राम, आकाश वगारे 25, रिद्धी डोंगरे डोंगरे, आशा चोपकर, मनीषा चोपकर 32, सुनंदा झोडे 45, शामकला राऊत 65, जय कला राऊत 32, विनिता परबते 50, नौशाद पठाण 30 यांना रात्री अडीच वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचे गांभीर्य पाहून कारवाईचे आदेश दिले सध्या राजापूर गावांमध्ये तणावाची स्थिती आहे. संपूर्ण गावात सध्या भीतीचे वातावरण आहे. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to burn all four alive on suspicion of witchcraft