धक्कादायक...  युवा शेतक-यांचा आत्महत्येचा प्रयत्न, जाणून घ्या कारण... 

संदीप रायपुरे
Thursday, 3 September 2020

भनारहेटी येथील केशव खामनकर याची वैनगंगा नदीकाठावर दहा एकर शेती आहे. वैनगंगा नदीला आलेल्या महापूराने खामनकर यांची दहा एकर शेती पूर्णत पाण्याखाली आली. दरम्यान सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांची मातीमोल झालेली अवस्था बघून तो पुर्णत हादरला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : निसर्गाची साथ नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही, याचे दाखले वारंवार मिळतात. सुरुवातीच्या काळात हवाहवासा वाटणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून नकोनकोसा झाला आहे.  मागील आठवड्यात पावसाने कहरच केला. मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाच्या झळा पूर्व विदर्भातील नागरिकांना भोगाव्या लागत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचे पडसाद आता उमटत आहेत. 

संजय सरोवरचे पाणी गोसीखुर्द धरणात सोडण्यात आले. यामुळे वैनगंगा नदीला महापूर आला. पुराने गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. पुराने उद्ध्वस्त झालेली शेती बघताच हादरलेल्या एका युवा शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल गोंडपिपरी तालुक्यातील भनारहेटी गावात घडली. जखमी अवस्थेत शेतक-याला रुग्णालयात भरती करण्यात आले असून, चंद्रपुरात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
 

भनारहेटी येथील केशव खामनकर याची वैनगंगा नदीकाठावर दहा एकर शेती आहे. वैनगंगा नदीला आलेल्या महापूराने खामनकर यांची दहा एकर शेती पूर्णत पाण्याखाली आली. दरम्यान सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांची मातीमोल झालेली अवस्था बघून तो पुर्णत हादरला. अशातच केशवने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.  वैनगंगेला आलेल्या महापूराने गोंडपिपरी तालुक्यातील जवळपास वीस गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे पुर्णत नुकसान झाले आहे. ही गंभीर अवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted suicide of farmers in Chandrapur district