
शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास या शेतकऱ्याचा एक बैल वेसण तोडून घरी परत आला. त्यामुळे शेतकऱ्याने लगेच आपल्या शेताकडे धाव घेतली असता, शेतामधील गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठाच खाक झाल्याचे आढळून आले.
वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?
मारेगाव (जि. यवतमाळ) : नुकताच पोळा साजरा झाला. शेतकऱ्यांनी आपल्या दैवत असलेल्या बैलाची मनोभावे पूजा केली. कारण हेच बैल त्याच्या शेतीची मशागत करण्यास उपयोगी पडते. मारेगाव तालुक्यातील चिंचाळ्यात एका गोठ्याला आग लागली अन् त्या आगीत बैलाचा होरपळून मृत्यू झाला.
याशिवाय शेतीपयोगी अवजारांसह अनेक साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आगीची घटना शनिवारी (ता. २९) सकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आली.
लोभेश्वर गोसाई खोले व संतोष गोसाई खोले (दोन्ही रा. चिंचाळा) असे आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. लोभेश्वर व संतोष खोले यांची मारेगाव तालुक्यातील चिंचाळा शिवारात दहा एकर शेत जमीन आहे.
बैल वेसण तोडून घरी आला
प्राप्त माहितीनुसार, आज शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास या शेतकऱ्याचा एक बैल वेसण तोडून घरी परत आला. त्यामुळे शेतकऱ्याने लगेच आपल्या शेताकडे धाव घेतली असता, शेतामधील गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठाच खाक झाल्याचे आढळून आले. या आगीत एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर एक बैल गंभीरावस्थेत भाजून जखमी झाला आहे.
असं घडलंच कसं : उडीद पीक कापणीची वेळ अन् पावसाने केला खेळ...शेतकऱ्यांवर ओढवले नवीनच संकट
आगीत तीन लाखांचे नुकसान
या गोठ्यात असलेले १६ बॅग रासायनिक खत, बी-बियाणे, कीटकनाशकांची फवारणी करणारे यंत्र, विविध शेतीमशागतीची साधने, पाइप, कुटार, टिनपत्रे आदी शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे या आगीत शेतकऱ्याचे अंदाजित तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)