
अपघात, चोरी, लुटमार, खून, हाणामारी, दारू तस्करी, बेवारस आदी प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने अनेक वर्षापासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत
यवतमाळ : जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा परिसर विविध गुन्ह्यातील वाहनांनी व्यापून घेतला आहे. अनेक प्रकरणांचा निकाल वर्षानुवर्षे लागत नाही. त्यामुळे वाहने अक्षरश: सडण्याच्या मार्गावर आहेत. कोट्यवधींच्या घरात किंमत असलेल्या वाहनांना लिलावाची प्रतीक्षा आहे.
अपघात, चोरी, लुटमार, खून, हाणामारी, दारू तस्करी, बेवारस आदी प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने अनेक वर्षापासून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत. न्यायालयात निकाल लागण्यास विलंब होत असल्याने ही वाहने सांभाळण्याशिवाय पोलिसांपुढे दुसरा पर्याय नाही. अपघात झालेल्या वाहनाकडे मालक ढुंकूनही बघत नाही.
अनेक प्रकरणांचा निकाल वर्षानुवर्षे लागत नाही. त्यामुळे दीर्घ कालावधीत ही वाहने सडून जातात. न्यायालयाच्या आदेशानंतर वाहनांचा लिलाव केला जातो. मात्र, मागील काही वर्षांपासून लिलावाला मुहूर्तदेखील सापडला नाही. यवतमाळ शहरातील शहर पोलिस ठाणे, अवधूतवाडी पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय, वणी, पांढरकवडा, मारेगाव, पुसद, घाटंजी, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा आदी प्रमुख तालुक्यातील पोलिस ठाण्यांसह इतरही ठिकाणी वाहने सडत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या घरात असणारा मुद्देमाल सांभाळताना पोलिसांची कसरत होताना दिसते.
सुरक्षेला दिला जातो छेद
पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनातील सुटे भाग चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. ही वाहने एकाच ठिकाणी पडून राहतात. नव्या कोऱ्या वाहनातील बॅटरी, इंजिन, टायर व इतर सुटे भाग चोरटे लंपास करतात. त्यामुळे पोलिस ठाण्यातील सुरक्षेलाच छेद दिला जात असल्याचे दिसून येते.
क्लिक करा - बापरे!; पहाटे साडेपाच वाजता शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी केली आत्महत्या
जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांमध्ये अनेक वर्षांपासून जप्त करण्यात आलेली वाहने आहेत. या संदर्भात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बेवारस, गुन्ह्यातील वाहने, अपघात, आरटीओकडून आलेली आदी सर्व वाहनांचे वर्गीकरण करून त्यांची संख्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे. एसडीएम आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ
पोलिस अधीक्षक, यवतमाळ.
संपादन - अथर्व महांकाळ