धक्‍कादायक... ऑटोचालकाची "सुपारी किलिंग' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

आरोपी शुभांगी (नागपूर) व तिचा प्रियकर किसन विश्‍वकर्मा (रा. बिहार) अशी सुपारी देणाऱ्या प्रेमियुगुलाचे नाव आहे. बुधवारी शुभांगीसह तिची आई रत्नमाला मनोज गणवीर हिला अटक केली होती. आज (ता. 21) तिचा मामेभाऊ पंकज खोब्रागडे यालाही ताब्यात घेण्यात आले.

नागपूर : ऑटोचालक अरुण वाघमारे याची "सुपारी किलिंग' असून "स्टेज डान्सर' असलेल्या प्रेमियुगुलानेच कट रचून केल्याची माहिती समोर आली आहे. वाघमारे हत्याकांडात वाठोडा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली.

आरोपी शुभांगी (नागपूर) व तिचा प्रियकर किसन विश्‍वकर्मा (रा. बिहार) अशी सुपारी देणाऱ्या प्रेमियुगुलाचे नाव आहे. बुधवारी शुभांगीसह तिची आई रत्नमाला मनोज गणवीर हिला अटक केली होती. आज (ता. 21) तिचा मामेभाऊ पंकज खोब्रागडे यालाही ताब्यात घेण्यात आले. सुपारी किलर किसन विश्‍वकर्मा अद्याप फरार आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी ऊर्फ पिहू स्टेज डान्सर असून, तिची ओळख दिल्लीतील एका कार्यक्रमात किसन विश्‍वकर्माशी झाली होती. तेव्हापासून त्या दोघांची मैत्री झाली.

दोघेही स्टेज डान्सर असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशात शुभांगी आणि किसन यांचे नृत्याचे कार्यक्रम व्हायचे. दरम्यान, ऑटोचालक अरुण वाघमारेच्या (पारडी) त्रासाला कंटाळून भाऊ अविनाश खोब्रागडे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय रत्नमाला हिला होता. तसेच मोठी मुलगी प्रणिता हिच्यावर अरुणच्या आईने करणी केल्याचाही संशय होता. यासोबतच शुभांगी आणि किसनच्या प्रेमप्रकरणाबाबत अरुण बदनामी करीत होता.

या सर्व गोष्टी लक्षात घेत रत्नमाला, मुलगी शुभांगी, भाचा पंकज खोब्रागडे यांनी अरुणचा काटा काढण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे बिहारवरून किशन विश्‍वकर्मा याला नागपुरात बोलाविण्यात आले. त्याला पहिला टप्पा म्हणून 50 हजार रुपये सुपारी देण्यात आले. कटानुसार 16 नोव्हेंबरला किसनने ऑटोचालक अरुणची धारदार शस्त्राने तरोडी खुर्द गावाच्या परिसरात हत्या केली. एवढेच नव्हे तर आरोपी आत्या रत्नमाला ही अरुणचा रक्ताने माखलेला मृतदेह बघण्याकरिता घटनास्थळी आली होती.

वाठोडा पोलिसांनी नंदनवन पोलिसांच्या सहकार्याने या "ब्लाइंड मर्डर'चा पर्दाफाश केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. ढेरे, नंदनवनचे पोलिस निरीक्षक संदीपान पवार, सायबर क्राइमचे मिथुन नाईक, दीपक तऱ्हेकर, हवालदार राधेशाम खापेकर, आशीष बान्ते, हिमांशू पाटील, मंगेश टेंभरे, मिलिंद ठाकरे, चेतन पाटील, पूनम सेवतकर यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auto driver murder news