शासनाकडून कर्जमाफी मिळाली, ती घेऊन आम्ही गुन्हा केला काय, मग हा दुजाभाव का?

पी. डी. पाटील
Wednesday, 6 May 2020

कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. याची झळ सर्वच क्षेत्राला बसली आहे. या संकटामुळे शेतकरी होत्याचा नव्हता झाला.
 

रिसोड (जि.वाशीम) : कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना पीक कर्जवाटप केल्या जात आहे. खरिपाचा हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असल्यामुळे कर्जमाफी झालेले शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहेत. कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना पीककर्ज देण्या संदर्भात मुख्यालयाकडून कोणतेही आदेश नसल्याचे येथील वरिष्ठ निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. याची झळ सर्वच क्षेत्राला बसली आहे. या संकटामुळे शेतकरी होत्याचा नव्हता झाला.  शासनाकडून शेतकर्‍यांना बांधावर कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याचा निर्णय झाला. विद्यमान शासनाने थकीत शेतकर्‍यांचे दोन लाखापर्यंत कर्जमाफ करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे हे शेतकरी मुख्य प्रवाहात आले आहेत. कर्जमाफी झालेले शेतकरी कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत. 

आवश्यक वाचा - स्वाभिमानीला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का?

खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे हे शेतकरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. प्रत्यक्ष येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन चौकशी केली असता कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्याबाबत मुख्यालयाकडून कोणतेही आदेश नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा - आनंदाची बातमी : आता टाळेबंदीतही म्हणा 'शुभमंगल सावधान'

बँकेकडे पीककर्जासाठी चकरा
मागील दीड महिन्यापासून संचारबंदी असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात पैशाची अडचण निर्माण झाली आहे. त्यातच खरीप हंगाम ही जवळ आला आहे. त्यामुळे शेतकरी या बँकेकडे पीककर्जासाठी चकरा मारत आहेत. नियमित कर्जदार शेतकर्‍यांनाच पीककर्ज वाटप केल्या जात आहे. बँकेकडून एकप्रकारे दुजाभाव केल्या जात असल्याचे शेतकर्‍यांकडून बोलल्या जात आहे.

शेतकर्‍यांनी थोडा धीर धरावा
संचारबंदीमुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच सभासदांना पीककर्ज दिल्या जाणार आहे. शेतकर्‍यांनी थोडा धीर धरावा. कोणताही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही.
- सुभाष बाजड, उपकार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avoid giving loans from Bank to the farmers whose loans have been waived in washim