"नकोशी'ला गुराख्यामुळे मिळाले जीवनदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

खापा : सावनेर तालुक्‍यातील खापानजीकच्या खेर्डुका येथे गुराख्याला एका गोठ्यात नायलॉनच्या पिशवीत नवजात चिमुकली आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचा जन्म झाल्यामुळेच तिच्या पालकांनी तिला फेकून देण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा रंगली आहे. 

खापा : सावनेर तालुक्‍यातील खापानजीकच्या खेर्डुका येथे गुराख्याला एका गोठ्यात नायलॉनच्या पिशवीत नवजात चिमुकली आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचा जन्म झाल्यामुळेच तिच्या पालकांनी तिला फेकून देण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा रंगली आहे. 

रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गुराखी बळीराम चौधरी जनावरे चरावयास घेऊन जात असताना गोविंद गोहणे यांच्या गोठ्यातून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज एका पिशवीतून येत असल्याने बळीरामने गावात येऊन पोलिस पाटील वीरेंद्र चोपडे यांना माहिती दिली. चोपडे गुराख्याला सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथे एका नायलॉनच्या पिशवीत नवजात बाळ आढळून आले. या बाबीची माहिती चोपडे यांनी खापा पोलिसांना दिली. 

नवजात चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी तिला बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर बाळाची नाळही कापलेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे बाळ जन्माला येताच फेकून दिल्याचा निष्कर्ष लावण्यात आला. बाळाचे वजन अडीच किलो असून, ते स्वस्थ असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळावर उपचार करण्यात आल्यावर खापा पोलिसांच्या मदतीने बाळाला प्राथमिक उपचाराकरिता नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस पाटील वीरेंद्र चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खाप्याचे ठाणेदार हर्षल एकरे यांनी गुन्हा नोंद केला असून, पालकाचा शोध सुरू केला आहे.

खापा परिसरात चर्चेला उधाण 
नवजात चिमुकली रंगाने गोरी आहे. तिची पूर्ण वाढ झाली आहे. मुलगी असल्याने तिच्या पालकांनी तिला फेकून दिले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. यासोबतच निर्दयी माता-पित्यांनाही नागरिक दूषणे देत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A baby girl got life because of a man