यवतमाळातील भाईंना हवाय हप्ता; व्यावसायिकांना धमक्या; पोलिसांचे दुर्लक्ष 

सूरज पाटील 
Tuesday, 17 November 2020

यवतमाळ शहरातील गुन्हेगारी वर्तुळाचा दबदबा महानगरापर्यंत आहे. कालपर्यंत केवळ वर्चस्वासाठी परस्पर विरोधी टोळीतील पंटर व म्होरक्यांचा खून करण्याची व्यूहरचना आखली जात होती.

यवतमाळ : गुन्हेगारी वर्तुळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळ्या पुन्हा सरसावल्या आहेत. लहान, मोठ्या व्यावसायिकांना हप्ता अर्थात खंडणीसाठी शस्त्राच्या धाकावर धमक्या दिल्या जात आहेत. यासंदर्भात पोलिसांत तक्रारही देण्यात येत आहेत. तरीदेखील तथाकथित ‘भाई’ जुमानत नसल्याने खाकीचा वचक संपल्याची ओरड होत आहे.

यवतमाळ शहरातील गुन्हेगारी वर्तुळाचा दबदबा महानगरापर्यंत आहे. कालपर्यंत केवळ वर्चस्वासाठी परस्पर विरोधी टोळीतील पंटर व म्होरक्यांचा खून करण्याची व्यूहरचना आखली जात होती. वाळूतस्करी, अपहरण, बनावटी दारू, मटका, क्रिकेट सट्टा, जुगार आदी अवैध मार्गाने म्होरक्याकडे कोट्यवधी रुपयांची माया आली आहे. 

सविस्तर वाचा - बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने; लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

आता व्यावसायिक वर्गात दहशत निर्माण करून ‘यवतमाळ के डॉन हम’, ही बिरुदावली लावण्यासाठी तथाकथित भाई चांगलेच सरसावले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी अवैध धंदे चालणार नाहीत, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार वरवर अवैध व्यवसाय बंद असल्याचे दाखविले जात आहे. 

खंडणी वसुलीसाठी विविध टोळक्यातील गुंड रस्त्यावर फिरत असल्याने खाकीचा नेमका धाक किती, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. तीस रूपये, दोनशे, चारशे रुपये हप्ता वसुलीचा वाद समजून पोलिस हे सर्व प्रकरण ‘लाईटली’ घेत आहेत. मात्र, त्यातूनच आगामी काळात रक्तपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
दारव्हा रोड

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता.13) दुपारी दारव्हा रोडवरील पत्रकार भवनकडे जाणार्‍या रोडवर आम्ही अक्षय राठोडची माणसे आहोत. या ठिकाणाहून वाहने चालवायची असेल, तर प्रतिदिन 30 रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली. एका चालकाने त्यास नकार दिल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. गुन्हा नोंद करण्यापूर्वी पोलिसांनी वाहनचालकांकडे ‘हद्दवाढी’चा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

.बसस्थानक चौक

दिवाळीच्या दिवशी बसस्थानक चौकातील पेट्रोल पंपावर शनिवारी (ता.14) रात्री दोघांनी पेट्रोल भरले. नौकराने पैसे मागीतले असता, नकार दिला. मालकाने जाब विचारताच, त्याच्याकडे महिन्याला दोनशे रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. याही प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

भोसा रोड

भोसा रोडवरील पेट्रोलपंपावर तिघांनी शंभर रुपयाचे पेट्रोल भरले. नोकराने पैसे मागीतले असता, पैसे देण्यास नकार दिला. ‘हम यहच के दादा है’, पेट्रोल पंप चलाना हे तो 400 रुपये हप्ता देना पडेगा’ असे म्हणत खंडणीची मागणी केली. याप्रकरणी पांडुरंग गुन्हाने यांनी अवधूतवाडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून भोला याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad people in Yvatmal wants extortion money from businessman