बाजार समिती यार्डात पैसे बुडव्या व्यापाऱ्यांना बंदी 

अमर मोकाशी
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

खरेदीनंतर चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे द्यावेत, असा बाजार समितीचा नियम आहे. मात्र, या नियमांचे पालन केले जात नाही. मालविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येथे 24 तासांच्या आत विक्री केलेल्या मालाचे पूर्ण पैसे कधीच मिळत नाहीत.

भिवापूर, (जि. नागपूर) :  कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात शेतमालाची खरेदी करून पैसे थकविणाऱ्या काही नामवंत व्यापाऱ्यांना माल खरेदीसाठी मदत करायची नाही. तसेच माल विक्रीही करायचा नाही, असा निर्णय बाजार समितीच्या दलालांनी घेतला आहे. यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना व दलालांना उमरेड किंवा नागपूरच्या व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 

बाजार समितीने ठरवून दिलेल्या नियमांना बगल देत खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पाडल्याने, व्यापाऱ्यांनी थकविलेली रक्कम वसुल करण्यास बाजार समिती कायदेशीर पद्धतीने दलालांना कोणतीही मदत करू शकत नाही. त्यामुळे नाइलाजाने सर्व दलालांनी एकत्र येत पैसे बुडव्या व्यापाऱ्यांच्या खरेदीवर मागील वर्षाच्या हंगामापासून बंदी केली आहे. यानंतरही करूनही थकलेली रक्कम वसूल होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे दलालांच्या गोटात हल्ली चिंतेचे वातावरण आहे. हा आकडा कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे. 

पूर्ण पैसे कधीच मिळत नाहीत

बाजार समिती यार्डात शेतकरी सोयाबीन, धान, कापूस, हरभरा, गहू व इतर शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला आणतात. हा माल व्यापारी दलालांच्या माध्यमातून खरेदी करतो. खरेदीनंतर चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे द्यावेत, असा बाजार समितीचा नियम आहे. मात्र, या नियमांचे पालन केले जात नाही. मालविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येथे 24 तासांच्या आत विक्री केलेल्या मालाचे पूर्ण पैसे कधीच मिळत नाहीत. दलाल त्यांना थोडीफार रक्कम देऊन उरलेली रक्कम आठवडा तर कधी दोन आठवड्यात चुकता करण्याचे आश्वासन देतो. खरेदी करणारे व्यापारीदेखील असेच धोरण अवलंबतात. खरेदी केलेला माल बाहेरच्या बाजारपेठेत विक्रीनंतर त्याचा चुकारा दलालांना करतो. असा प्रकार बाजार समित्यांमध्ये पूर्वीपासून सुरू आहे. 

दलालांच्या व्यवहारावर व्यापारी उदार

"लेन-देन'चा हा कालावधी कधी एक तर कधी दोन आठवड्यांचा असतो. कधीकधी यात कित्येक आठवडे निघून जातात. दलालाने दिलेला अवधी निघून गेला की, उरलेल्या रकमेकरिता शेतकरी दलालाकडे तगादा लावतात. त्यामुळे अनेकदा व्यापाऱ्याने चुकारा दिलेला नसतानाही दलाल स्वत:जवळची रकम देऊन शेतकऱ्यांचे हिशेब पूर्ण करतात. यामुळे व्यापारी चोख व्यवहार करीत नाहीत. 

यापूर्वीही घडला असा प्रकार

व्यापाऱ्यांकडून पैसे थकविल्या गेल्याची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी काही व्यापाऱ्यांनी गोड बोलून गळा कापण्याचा प्रकार केला आहे. लाखोंच्या घरात असलेली ही रक्‍कम अद्याप दलालांना मिळालेली नाही. वारंवार विश्वासघात होऊनही चुकाऱ्याच्या बाबतीत दलाल बाजार समितीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. तर बाजार समितीही त्यांच्यावर कार्यवाही करताना दिसत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on traders who sip money in Bhivapur