हिवाळी अधिवेशन : सावरकरांच्या मुद्यावरून सभागृहात झळकले बॅनर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

महाविकास आघाडीच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे "वंदे मातरम्‌'ने झाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली. परंतु, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि देशाचे सरन्यायाधीश झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर आपले मुद्दे मांडण्याची सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात पडले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावानंतर लगेच विरोधीपक्षाने आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात बॅनर झळकवित राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत गोंधळ घातला. सावरकरांबद्दल बोलू देत नसलेले सरकार हे इंग्रजांचे सरकार आहे काय, असा सवालही विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूबही करावे लागले. 

झारखंडमधील सभेतील "रेप इन इंडिया' या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपसह तमाम सावरकरप्रेमींकडून होत आहे. मात्र, "माफी मागायला माझे नाव काही राहुल सावरकर नाही', असं म्हणत राहुल गांधींनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. विशेषतः भाजपचे नेते या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सावरकर अपमानाच्या विषयावरून गदारोळ होण्याची चिन्हे होतीच. हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या चहापानावर बहिष्कारही टाकला होता. त्याचाच पुढचा प्रयोग सोमवारी विधानसभेत पाहायला मिळाला.

सविस्तर वाचा -  सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून वातावरण तापले 

कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब

महाविकास आघाडीच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे "वंदे मातरम्‌'ने झाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली. परंतु, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि देशाचे सरन्यायाधीश झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर आपले मुद्दे मांडण्याची सूचना विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. हा प्रस्ताव एकमताने संमतही करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत कॉंग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, हे बोलणे रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. नाना पटोले यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप आमदारांनी सभागृहात सावरकरांचे बॅनर झळकावित घोषणाबाजी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banner flashes in the hall over the issue of Savarkar