सलून व्यावसायिकांची कैची ठप्प; खाण्यापिण्याचे वांधे झाल्याने सरकारकडून मदतीची अपेक्षा 

barber
barber

सेवाग्राम (जि. वर्धा) : ज्या व्यक्‍तीच्या हातात कला आहे, ती व्यक्‍ती उपाशी राहत नाही, असे म्हटले जाते; पण कोरोना विषाणूने सर्वांनाच हताश केले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद आहेत. परिणामी, सलून व्यवसाय ठप्प झाल्याने कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने सलून व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे.
 
कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर करून सर्व नागरिकांना घरात राहण्याची सक्ती केली आहे, तर दुकाने अनिश्‍चित काळाकरिता बंद ठेवण्याचे सांगितले आहे. सलून कारागीर आपल्या अंगी असलेल्या कलेतून नागरिकांची पाहिजे तशी कटिंग करून देतात. केशरचनाही सुंदरतेचाच एक भाग आहे. नाभिक समाजातील हजारो व्यक्तींचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर अवलंबून आहे. अनेक कारागीर दुसऱ्यांच्या दुकानावर काम करतात. काही जण निम्मे मजुरीत, तर काही जण रोजंदारीप्रमाणे काम करतात. त्यांना दररोज मजुरी दिली जाते. 

सलून व्यवसायात  सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. सलून व्यावसायिकांना आजाराचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण होऊ शकते. लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यांच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. जवळील पैसे खर्च झाल्याने आता कसे जगावे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. या व्यवसायात अनेक कारागीर दुकानात रोजंदारीवर किंवा अर्धमिळकतीवर काम करतात. दररोज कमविणे आणि खाणे, असाच त्यांचा दिनक्रम आहे. लॉकडाउनमुळे सलून व्यावसायिक व कारागिरांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने सलून व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी नाभिक समाजाकडून होत आहे. 

आर्थिक मदत करावी माणसाला सुंदर ठेवणारा कारागीर माणसाच्या दुर्लक्षितपणामुळे उपासमार सोसत आहे. श्रीमंत असो की, गरीब प्रत्येकाची तो कटिंग, दाढी करतो. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आर्थिक साहाय्य करण्याची गरज आहे.
- रवी वाटकर ,सलून व्यावसायिक

मुख्यमंत्र्यांनाही निवेदन
कोरोना संसर्गजन्य आजारावर आळा घालण्याकरिता सरकार प्रयत्न करीत आहे. शासनाने नाभिक बांधवांना जीवन जगण्याइतके साहित्य आणि आर्थिक मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे. 
- रवी बेलपत्रे, प्रदेशाध्यक्ष, नाभिक समाज महामंडळ 

जिल्ह्यातील अनेक समाजबांधव सलून दुकानात कारागीर म्हणून काम करतात. सलून दुकान बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदतीची अत्याधिक गरज आहे. 
- अशोक किन्हेकर 
जिल्हाध्यक्ष, नाभिक समाज महामंडळ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com