
वर्धेत बार्टीची चाळणी परीक्षा रद्द
वर्धा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने रविवारी (ता.३१) शहरातील दोन महाविद्यालयात आयबीपीएस पुर्व तयारी निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, एका केंद्रावर परीक्षेच्या पश्नपक्षीकाच कमी पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे रविवारी झालेल्या या परीक्षेचा पेपर रद्द करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या वतीने राज्यात पोलिस, बँक, रेल्वे, आयुर्विमा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पूर्व निवड परीक्षा घेतली जाते. त्या अनुषंगाने रविवारी (ता.३१) प्रवेश चाळणी परीक्षेचे आयोजन शहरातील लोकमहाविद्यालय तसेच यशवंत महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एक हजार २१० विद्यार्थ्यी बसले होते. मात्र, परीक्षेसाठी केवळ ७०० प्रश्नपत्रीका परीक्षा केद्रावर दाखल झाल्याने दोन केंद्रावरवर एका वेळी होणाऱ्या पेपरच्या वेळेत बदल करण्यात आला.
लोकमहाविद्यालयात परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना पेपर न मिळाल्याने अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुचना देत दुपारी दोन वाजता पेपर घेण्याचे नियोजन केले होते. यशवंत महाविद्यालय येथे नियोजित वेळेत पेपर घेण्यात आला. मात्र, येथील विद्यार्थ्यांनी झालेल्या पेपरची प्रश्नपत्रीकेचा फोटो काढून व्हायरल केला. तो पेपर लोकमहाविद्यालायतील गाठल्याने तेथे गोंधळ उडाला. पेपर फुटल्याची चर्चा होताच पेपर रद्द करण्यात आला. तर वर्ध्यात एका परीक्षा केंद्रावर झालेली परीक्षा ही रद्द करण्यात आली.
चूकीचे खापर लिपीकावर
बॅंक, रेल्वे, तलाठी, पोलिस भर्ती आदीच्या प्रशिक्षणासाठी बार्टीच्या वतीने तयारी पुर्व परीक्षा घेतली जाते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातून १२०० अर्ज दाखल झाले. त्यापैकी या परीक्षा चाळणीतून १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार होती. त्या संदर्भात २६ तारखेला अंतीम प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मात्र कंत्राटी स्वरूपावर काम करणाऱ्या लिपीकाच्या हातून ही चूक झाली असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
बार्टीच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन हे स्थानिक रामनगर येथील संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. दोन्ही केंद्रावर पेपरला सुरूवात झाली मात्र लोकमहाविद्यालयात अर्ध्याच विद्यार्थ्यांना पेपर मिळाला तर अर्धे विद्यार्थी ताटळत राहिले. परिणामी पेपर फुटल्याची चर्चा उडाली. तर यशवंत महाविद्यालयात नियोजित वेळी पेपर झाला. मात्र, आता पेपर रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.