आधार कार्ड ठरवले बोगस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नागपूर :  वन विभागातील वनरक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीच्या ऑनलाइन परीक्षेत यवतमाळ येथे झालेल्या गोंधळानंतर मंगळवारी (ता. 11) नागपुरातील रायसोनी बिझनेस अकादमीमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून मान्य करता येणार नाही, असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांना परीक्षेपासून वंचित ठेवले. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात मुख्य वनसंरक्षक एस. एस. दहीवाले यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

राज्यातील 900 पेक्षा अधिक वनसंरक्षक भरती प्रक्रिया राज्यभरातील विविध केंद्रांवर नऊ जूनपासून ऑनलाइन घेण्यात येत आहे. 22 जूनपर्यंत या परीक्षेचे वेळापत्रकही प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने जाहीर केले. ऑनलाइन परीक्षा दहा ते साडेअकरा आणि दुपारी 2.30 ते चार वाजेपर्यंत अशा दोन टप्प्यात घेण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यातील डॉ. भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात तांत्रिक कारणांमुळे नऊ जूनला दुसऱ्या पाळीतील आणि दहा जूनच्या दोन्ही पाळीतील परीक्षा रद्द करण्यात आल्या. असे असताना आज नागपुरातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या परिसराशेजारील रायसोनी बिझनेस अकादमीत दुसऱ्या पाळीसाठी परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थी केंद्रावर पोचले. दरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन काढलेले आधार कार्ड ओळखपत्र म्हणून चालत नाही असे कारण देत केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षा देण्यास मज्जाव केला. आधार कार्ड केंद्र सरकारने दिलेले ओळखपत्र आहे. त्यावरच सर्व व्यवहार होत असताना परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून का चालणार नाही, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी ऐकून न घेतल्याने काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता. तुम्ही कुठेही तक्रार करा तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, अशी तंबीही अधिकाऱ्यांनी दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अखेर विद्यार्थ्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील मानव संसाधन व्यवस्थापनाचे मुख्य वनसंरक्षक एस. एस. दहीवाले यांची भेट घेतली. वन विभागाने दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय न घेतल्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असल्याचे परीक्षार्थींनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. पुन्हा परीक्षा देण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Base cards fixed bogus