Buldhana News : बावन्न बुरुजांच्या तटबंदीमुळे नाव पडले बावनबुर्जी; आता केवळ दोन बुरूज आणि ऐतिहासिक विहिरीचा घुमट तेवढा शिल्लक

करवंड गावात परकोटात असलेला दुमजली लाकडी राजवाडा असून, राजवाड्यात पायऱ्यांची सुबक नक्षीकाम व वरती मंदिरासारखे घुमट असलेली विहीर आहे.
Bawanburji
Bawanburjisakal
Updated on

- प्रा. विजय घ्याळ

शेलसूर (जि. बुलडाणा) - सन १६५७ मधली १५ एप्रिल. म्हणजेच तब्बल ३६८ वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील करवंड (ता. चिखली) गावातील वतनदार इंगळे यांच्या कुटुंबात एक शुभकार्य झाले. शिवाजीराव इंगळे यांची मुलगी गुणवंताबाई हिच्याशी विवाह करून छत्रपती शिवाजी महाराज करवंडचे जावई झाले. इंगळे कुटुंबातील आणखी एका मुलीचा विवाह भोसले घराण्यात झाला.

शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ तंजावरचे महाराज व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी महाराणी दिपांबाबाईसाहेब याही करवंडच्याच इंगळे कुटुंबातील कन्या. यापूर्वी शेजारच्या सिंदखेडराजाच्या जाधव घरातल्या जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला व त्यांच्यात पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

करवंड गावाचे तत्कालीन नाव बावनबुर्जी असे होते. गावच्या चोहोबाजूंनी परकोटाची तटबंदी. या तटबंदीबरोबर मधे टेहळणीसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल बावन्न बुरुजांची तटबंदी असल्यामुळे या गावास बावनबुर्जी हे नाव पडले. या गावच्या दोन लेकींना स्वराज्याच्या दोन छत्रपतींच्या महाराणी होण्याचा बहुमान मिळाला आहे. पान २ वर

या दोन्ही विवाहांचा उल्लेख तंजावर येथील शिलालेखात मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी महाराणी गुणवंताबाईसाहेब याच गावच्या वतनदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा विवाह १५ एप्रिल १६५७ रोजी झाल्याची तसेच व्यंकोजी महाराज यांच्या पत्नी महाराणी दिपांबाबाईसाहेब यांच्या विवाहाची नोंद इतिहासात नमूद आहे.

महाराजांच्या सेनेतील मावळे

स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या मावळ्यांनी साथ दिली त्यात विदर्भातील सिंदखेडराजा येथील राजे जाधव व तर बावनबुर्जीच्या (करवंड) इंगळे घराण्याचा समावेश होता.

महाराणी गुणवंताबाईसाहेबांचे वडील शिवाजीराव इंगळे हे शिवाजी महाराजांच्या खळद बेलसरच्या पहिल्या लढाईपासूनच त्यांच्यासोबत होते. तर त्यांचे बंधू काकाजी इंगळे हे अफजलखान वधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या मोजक्या दहा अंगरक्षकांच्यापैकी एक होते. यासोबतच या गावातील वीर माणकोजी दहातोंडे हेही मराठा सैन्यात कामगिरीवर होते.

संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित करून मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. कटक ते सूरत आणि पेशावर ते तंजावर अशी सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मराठी सरदारांची खूपच कमी माहिती आज उपलब्ध आहे. तंजावर येथील ब्रगदेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. हा संपूर्ण इतिहास आजच्या पिढीसमोर यायला हवा.

- बाबाजीराजे इंगळे

ऐतिहासिक बांधकामाची पडझड

करवंड गावात परकोटात असलेला दुमजली लाकडी राजवाडा असून, राजवाड्यात पायऱ्यांची सुबक नक्षीकाम व वरती मंदिरासारखे घुमट असलेली विहीर आहे. राजवाड्यापासून काही अंतरावर महादेवाचे हेमाडपंथी बागेश्वर मंदिर व परकोटाच्या बाहेर कढईमातेचे अतिशय पुरातन व सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर आहे.

जवळच्या निसर्गरम्य परिसरात वेढलेले कबंळनाथ तीर्थस्थान आहे. काळाच्या ओघात वाड्याची संपूर्ण पडझड झाली आहे. बरेचसे बुरूजही काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. स्वराज्याच्या महाराणींचे माहेर असलेल्या या पावनभूमीचे पावित्र्य जपत त्यांचे एक देखणे स्मारक याठिकाणी निर्माण व्हावे, अशी मागणी करवंडवासीकडून करण्यात येत आहे.

आमच्या गावचा हा देदीप्यमान इतिहास पुढच्या पिढीला समजावा यासाठी गावातील ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. शासनाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देऊन महाराणी गुणवंताबाई व महाराणी दिपांबाबाई यांचे स्मारक करण्यासाठी पावले उचलावीत.

- विठ्ठल पिवळ, पोलिस पाटील, करवंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com