esakal | धोक्‍याची घंटा! अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात 
sakal

बोलून बातमी शोधा

juvenile crime

तत्कालीन पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे ब्रेन वॉशिंग केल्यानंतर काहींच्या जीवनात परिवर्तन घडून आले. अलीकडे खून, हाणामारी, खंडणी, चोरी, तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन अर्थात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा चिंताजनक सहभाग आढळून येत आहे.

धोक्‍याची घंटा! अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात 

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : शहरातील टोळीयुद्ध थांबल्याचे वरपांगी दिसत असले, तरी गल्लीबोळात नवनवीन तथाकथित भाईंचा जन्म होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण अल्पवयीन मुलांना व्यसनाच्या आहारी घेऊन जात आहेत. मग त्यांचाच वापर ते गुन्हेगारी कृत्यासाठी करीत आहेत. वीस वर्षांपूर्वी बिच्छू गॅंगने असाच उच्छाद शहरात मांडला होता. तीच मोड्‌स ऑपरेंडी अजूनही वापरली जात आहे. 

गुन्हेगारांना राजकारण्यांचा आश्रय

यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळाची चर्चा नागपूर, पुणे, मुंबईत होते. गुन्हेगारांना राजकीय पुढाऱ्यांचा काहीअंशी आश्रय मिळत असल्याने येथील गुन्हेगारी पूर्णत: मोडीत निघू शकली नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ती अस्तित्वात राहतेच. पूर्वी शहरात गुन्हेगारी विश्‍वात वर्चस्व निर्माण करण्याच्या मनसुब्यातून टोळीयुद्धाचा भडका उडायचा. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रमुख टोळींमध्ये काही प्रमाणात निरव शांतता आहे. प्रत्यक्षात आतमध्ये आग तितकीच धुमसत असल्याचे बोलले जाते. 20 वर्षांपूर्वी शहरात बिच्छू गॅंग अस्तित्वात होती. या गॅंगने आपले मनसुबे फत्ते करण्यासाठी अल्पवयीन मुलांनाच कामी लावले होते. व्यसनाधीन झाल्यानंतर भाईच्या इशाऱ्यावर ही मुले नाचत होती. यात मध्यमवर्गीय कुटुंबातील आणि हुशार मुलेदेखील अडकली होती. 

अवश्‍य वाचा- हे चाललयं तरी काय? चिमुरडीवर अत्याचार, दुसरीवर बळजबरीचा प्रयत्न 

शाळकरी विद्यार्थ्यांची वाढती संख्या

तत्कालीन पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे ब्रेन वॉशिंग केल्यानंतर काहींच्या जीवनात परिवर्तन घडून आले. अलीकडे खून, हाणामारी, खंडणी, चोरी, तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन अर्थात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा चिंताजनक सहभाग आढळून येत आहे. सावकारी, मटका, जुगार इत्यादींच्या माध्यमातून गब्बर झालेल्यांनी आपला मोर्चा अल्पवयीन मुलांकडे वळविला आहे. त्यासाठी बिच्छू गॅंगचीच मोड्‌स ऑपरेंडी अवलंबिली जात आहे. गल्लीबोळांतील भाईंसह "वट' जमविण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे. 

रोकटोक केल्यास तक्रार

गुन्हेगारी टोळींच्या संपर्कात आल्यानंतर या मुलांच्या एकूणच लाइफस्टाईलमध्ये बदल जाणवतो. आपण खूप मोठे भाई आहोत, या आविर्भावात ते वावरतात. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांकडून रोकटोक केली जाते. मग गुन्हेगारी वर्तुळातील म्होरके खाकीसोबतच हिशेब चुकता करण्यासाठी या मुलांचा वापर करतात. आपण प्रतिष्ठित कुटुंबातील असून, गुन्हेगारीत कोणताही सहभाग नाही. तरीदेखील पोलिसांकडून त्रास दिला जातो, अशी तक्रार वरिष्ठांकडे केली जाते. असा प्रकार एलसीबीच्या एका पथकासोबत घडला आहे.