खवय्यांनो, मासे खाताना घ्या ही काळजी... मासेमार वापरताहेत हा फंडा! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

मागील काही वर्षांपासून मासेमारी करण्यासाठी पाण्यात विष मिसळविले जाते. हा प्रकार सर्वत्र सुरू असल्याने विषयुक्त मासे खाणाऱ्या शौकिनांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असून पाण्यातील जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

गडचिरोली : हल्ली फारशी मेहनत न करता अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमविण्याचे फंडे वापरले जात आहेत. आता त्यात भर पडली आहे ती राज्यभरातील मासेमारीच्या नवीन पद्धतीची. पाण्यात कीटकनाशक औषधांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याला भोई आणि ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या या जीवघेणी व्यवसायाला आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

अवश्‍य वाचा- अन्‌ त्यांचा अखेरचा प्रवासही सोबतच झाला... 

मागील काही वर्षांपासून मासेमारी करण्यासाठी पाण्यात विष मिसळविले जाते. हा प्रकार सर्वत्र सुरू असल्याने विषयुक्त मासे खाणाऱ्या शौकिनांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असून पाण्यातील जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पाणी शुद्धीकरणाला हातभार लावणारे जीवजंतू नष्ट होत आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. राज्यात मासेमारीतून दररोज लाखो लोकांना रोजगार मिळतो. मुख्यतः तलाव, बोडी व नदीच्या पाण्यातून मासेमारी केली जाते. नदीपात्रात पाणी वळते करून त्याचे डबके तयार करून त्या पाण्यात कीटकनाशक औषधी टाकली जाते. ही प्रक्रिया विशेषतः रात्री पार पाडली जाते. विष टाकल्याने सकाळी पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसतात. ती बाहेर काढल्यानंतर भाजून त्यांची बाजारात विक्री केली जाते. मास्यांवर विषप्रयोगासाठी कमी पाण्याचे ठिकाण तसेच साचलेल्या पाण्याचा वापर केला जारो. कीटकनाशक औषधांचा वास येऊ नये म्हणून मासे भाजण्याची प्रक्रिया केली जाते. पाण्यातील जीवजंतू खाऊन मासे आपली उपजीविका भागवतात. यामुळे पाणी शुद्ध राहण्यासाठी 
मोठी मदत होते. याशिवाय विषयुक्त पाण्यामुळे मास्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाल्याने त्यांच्या उत्पन्नातही घट होत आहे. याचा फटका मासेमारांना बसत आहे. 

कमी श्रमात अधिक मिळकतीसाठी विषप्रयोग

गावपातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शासनाकडून मत्स्य व्यवसायाला चालना दिली जात आहे. यामुळे भोई-ढीवर समाजच नाही तर अन्य समाजातील लोकही या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, लालचेपोटी मासेमारीसाठी कीटकनाशक औषधांचा वापर होत असल्याने त्याचे परिणाम या व्यवसायावर होत आहे. या प्रकाराला आळा बसावा यासाठी गडचिरोली येथील मच्छिमारांनी पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून त्यांचे साहित्य व विषारी मासे जप्त केले होते. मात्र, कारवाईनंतरही कीटकनाशक औषधांतून मासेमारी केली जात आहे. 

मासेमारीसाठी कीटकनाशक औषधांचा वापर होत असल्याच्या तक्रारी संघटनेला प्राप्त आल्या आहेत. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून राज्यात सर्वत्र सुरू आहे. कमी वेळात पैसे कमविण्याच्या लालचेने काही लोकांचे अफलातून काम सुरू आहे. पारंपरिक मच्छिमार बांधवांचा याला विरोध आहे. विषप्रयोगाद्वारे केलेली मासेमारी आरोग्याला धोकादायक आहे. ही चिंतेची बाब असून या प्रकाराला आळा बसणे गरजेचे आहे. 
- बाबूराव बावणे, जिल्हाध्यक्ष भोई-ढिवर समाज संघटना गडचिरोली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be alert! take care when eating fish ... This fund is using the fishing!