esakal | सावधान! पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे...थांबा, पहा मग पुढे चला
sakal

बोलून बातमी शोधा

 सिरोंचा : येथील सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर पडलेले झाड.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात जंगलातील लहान, मोठे वृक्ष वादळामुळे कोसळत असतात. सिरोंचा ते आलापल्ली या महामार्गाचा शंभर किमीचा भाग पूर्णपणे जंगलातून जातो.

सावधान! पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे...थांबा, पहा मग पुढे चला

sakal_logo
By
तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष कोसळून रस्त्यावर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, हे वृक्ष अनेक तास, तर कधी अनेक दिवस रस्त्यावरून उचललेच जात नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: येथील सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर ही समस्या अधिक भेडसावत असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

पावसाळ्यात जंगलातील लहान, मोठे वृक्ष वादळामुळे कोसळत असतात. सिरोंचा ते आलापल्ली या महामार्गाचा शंभर किमीचा भाग पूर्णपणे जंगलातून जातो. विशेष म्हणजे, या शंभर किमीच्या महामार्गात जवळपास 50 ठिकाणी तीक्ष्ण वळणे आहेत. या वळणांवर झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुढून येणारे वाहन चालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. पावसाळ्यात वाऱ्याचा वेग वाढतो व वादळही येत असल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडतात. त्यामुळे वाहनधारकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करीत वाहन चालवावे लागत आहे.

या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

रस्त्याचा दोन्ही बाजूला वाहन चिखलात फसण्याची भीती असल्याने जड वाहनांना बाजूला घेणे कठीण होत आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावरच पडून असल्याने वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाहीत. शिवाय मोठा वृक्ष असला; तर वाहतुकीचा खोळंबा होतो. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडून आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक आधीच त्रस्त आहेत. त्यात आता ही दुसरी समस्या वाहनधारकांच्या पुढे उभी राहिल्याने त्यांना वाहन चालविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय?

महामार्गावर एकीकडे खड्डे व दुसरीकडे रस्त्यावर पडून असलेले झाडे, यामुळे जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. वाहन चालविण्यात अडथळा निर्माण होत आहे. इकडे आड, तिकडे विहीर, अशी परिस्थिती आहे. कोणतेही लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असून हे प्राधिकरण याकडे लक्ष देत नाही. हा रस्ता आपल्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग हात झटकत आहेत. त्यामुळे आता ही समस्या कशी सुटणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

जाणून घ्या : ना काही काम, त्यात पर्यटकांनी दाखवली पाठ; मग कमलापूरच्या हत्तींचे करायचे तरी काय?

रस्त्याच्या दर्जाबद्दल साशंकता

सिरोंचा-आलापल्ली महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यावर नागरिकांना याचा त्रास होऊ लागला. तेव्हा अनेक नागरिकांनी सरकार दरबारी ही समस्या नेली होती. त्यानंतर काही प्रमाणात रस्त्याची डागडुजी करण्यात आली. पण, ही डागडुजी यथातथाच झाल्याने या महामार्गाच्या दर्जाबद्दलच नागरिक शंका उपस्थित करीत आहेत.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)