अमरावती : रस्त्यावरच सुपरवायझरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती : रस्त्यावरच सुपरवायझरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

अमरावती : रस्त्यावरच सुपरवायझरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चोपले

अमरावती : साईनगर येथील सुरक्षा एजंसीच्या सुपरवायझरला महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून भररस्त्यात चोपले. रविवारी (ता. ८) दुपारी एक वाजताच्या सुमारास साईनगर ते नवाथे मार्गावर ही घटना घडली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. रस्त्यावर धडा शिकवल्यानंतर मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांनी या सुपरवायझरला आपल्या कारमध्ये बसवून राजापेठ ठाण्यात आणून, पोलिसांच्या सुपूर्द केले.

एका सिक्युरिटी एजंसीचे कार्यालय साईनगर परिसरात आहे. सदर एजंसी शहरातील मोठ्या खासगी शिक्षण संस्था, रुग्णालये यांना मागणीनुसार आवश्यक महिला व पुरुष सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करते. त्यामुळे साईनगर, नवाथे, गोपालनगर, मायानगर परिसरातील काही महिलांनी या सुरक्षाएजंसी कार्यालयामध्ये संपर्क साधून काम मिळविले. या महिलांना काही रुग्णालयासह इतर ठिकाणी पाठविण्यात आले.

सुरक्षारक्षक म्हणून नेमलेल्या महिलांना गणवेशासह इतर आवश्यक साहित्य एजंसीमार्फत पुरविले जाते. येथील सुपरवायझर अरुण गाडवे (वय ५२) हा गणवेश शिवायचा असल्याचे सांगून त्यांच्यासोबत लगट करीत होता. अनावश्यक चर्चा करून असभ्य वर्तन करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी मनसेकडे तक्रार केली.

या पदाधिकाऱ्यांनी सुपरवायझरला बोलाविले. तेथे त्याला विचारणा करीत असताना काही महिला पदाधिकाऱ्यांसह मनसेच्या युवकांनी सुपरवायझरला चोपले. एजंसीमार्फत एका मोठ्या रुग्णालयात नियुक्त महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा वेतनासाठी अडविले जात असल्याचा आरोप केला. महिलांनी याप्रकरणाची राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली.

महिलांच्या तक्रारीवरून सुरक्षा एजंसीचा सुपरवायझर संशयित आरोपी अरुण गाडवे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे.
- किशोर शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे
टॅग्स :International Womens Day