esakal | सेवाग्राम-सावंगी रुग्णालयात खाटा फुल्ल, वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

file image

सेवाग्राम-सावंगी रुग्णालयात खाटा फुल्ल, वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली

sakal_logo
By
ऑनलाईन सकाळ टीम

वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सावंगी आणि सेवाग्राम हे दोन रुग्णालये ठेवण्यात आले आहेत. सध्या वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे या रुग्णालयात असलेली सुविधा कमी पडत असल्याचे समोर येत आहे. येथे रुग्णांना आल्यापावली परत करण्याचे प्रकार घडत आहेत. या दोन्ही रुग्णालयातील खाटा संपल्याने नागरिकांकरिता पर्यायी उपाययोजना आखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात 20 रुग्णखाटा आहेत. सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या खाटा अपुऱ्या पडत आहे. असलेल्या खाटांपैकी 19 खाटांवर सध्या रुग्ण असून केवळ एकच रुग्णखाट शिल्लक आहे. तसेच ऑक्‍सिजनच्या सर्वच रुग्णखाटांवर सध्या रुग्ण असल्याने नव्या रुग्णांना कुठे ठेवावे असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात एकूण 31 रुग्णखाटा आहेत. त्यापैकी 30 रुग्णखाटांवर कोविडबाधित रुग्ण असून केवळ एकच बेड रिक्त आहे. याच रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये एकूण 320 ऑक्‍सिजन बेड असून तब्बल 318 खाटांवर रुग्ण असून केवळ दोन रुग्णखाटा रिक्त आहेत.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही रुग्णालयातील रुग्णखाटा झपाट्याने फुल्ल होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने वेळीच योग्य पाऊल उचलून पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आले आहे.