अरे वा... यंदा प्रथमच वंचितांचे झाले कल्याण!

सुगत खाडे
Sunday, 1 March 2020

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने यंदा प्रथमच योजनांवर निधी खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. वैयक्तीक लाभांच्या योजनांसह दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर करण्यात आलेल्या तरतुदींच्या तुलनेत निधी खर्च करुन विभागाने वंचितांचे कल्याण केले आहे. त्यामुळे भरिप-बमसंच्या सत्तेत आतापर्यंत मागासवर्गीयांचे न झालेले कल्याण प्रशासकीय राजवटीत झाल्याचे दिसून येत आहे. 

अकोला : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने यंदा प्रथमच योजनांवर निधी खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. वैयक्तीक लाभांच्या योजनांसह दिव्यांग कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर करण्यात आलेल्या तरतुदींच्या तुलनेत निधी खर्च करुन विभागाने वंचितांचे कल्याण केले आहे. त्यामुळे भरिप-बमसंच्या सत्तेत आतापर्यंत मागासवर्गीयांचे न झालेले कल्याण प्रशासकीय राजवटीत झाल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेच्या सन् 2019-20 च्या अर्थसंकल्पात समाज कल्याण विभागासाठी वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यासाठी 3 कोटी 20 लाख 79 हजार 58 रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सदर तरतूदीमधून विविध प्रकारच्या वैयक्तीक लाभाच्या व इतर योजना राबविण्याचे नियोजन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या काळात करण्यात आले. त्यामुळे यंदा प्रथमच नऊ प्रकारच्या वैयक्तीक लाभांच्या योजनांवर दोन कोटी 26 लाख 31 हजार 807 रुपयांचा खर्च करण्यात विभागाला यश मिळाले.

सदर खर्चाच्या रक्कमेतून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात आले. त्यामुळे यावर्षीच खऱ्या अर्थाने वंचितांचे कल्याण झाल्याचे दिसून येत आहे. परंतु सत्ताधारी भारिप-बमसंचे सदस्य नव्या आर्थिक वर्षात कोण्याचे कल्याण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

दिव्यांगांचे सुद्धा कल्याण
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत पाच टक्के उपकरातून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याण योजनांवर सुद्धा तरतूदीच्या तुलनेत भक्कम निधी खर्च करण्यात आला आहे. दिव्यांगाना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेवर एक कोटी 46 लाख रुपयांचे नियोजन केल्यानंतर योजनेवर 1 कोटी 32 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेचा 132 दिव्यांगाना लाभ देण्यात आला आहे. याव्यतिरीक्त दिव्यांगांना 12 हजार रुपये आर्थिक मदत (पेंशन) देण्याच्या योजनेवर तरतूद करण्यात आलेले 2 कोटी 89 लाख 20 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. सदर योजनेचा 241 दिव्यांगाना लाभ देण्यात आला आहे. 

असा केला योजनांवर खर्च

  • टीनपत्रे पुरविण्याच्या योजनेवर 13 लाखांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 11 लाखांची रक्कम खर्च झाली. 106 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 
  • एचडीपीई पाईप पुरविण्याच्या योजनेवर 3 लाख 84 हजारांची तरतूद करण्यात आली. 3 लाख 60 हजार खर्च करण्यात आले. 30 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 
  • शिलाई मशीन पुरविण्याच्या योजनेवर 10 लाखांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 7 लाख 96 हजार खर्च करण्यात आले. 175 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 
  • डिझल पंप 3 एचपी पुरविण्याच्या योजनेवर 7 लाख 43 जारांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 5 लाख 71 हजार खर्च करून 36 लाभार्थ्याना लाभ देण्यात आला. 
  • दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी 2 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 1 कोटी 47 लाख खर्च करून 347 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 
  • पीव्हीसी पाईप योजनेवर 54 हजार, इलेक्ट्रिक पंप (पाच एचपी) वर 1 कोटी 26 लाख व 35 एचपी रोटाव्हेटर पुरविण्याच्या योजनेवर 35 लाख 35 हजार खर्च करण्यात आले. सदर योजनांचा अनुक्रमे 7, 67 व 44 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 

कोटेकोर नियोजनामुळेच योजना मार्गी
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने यावर्षी सर्व योजना राबविण्यासाठी काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळेच यावर्षी सर्वच योजना मार्गी लागल्या. तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी काही निधी अखर्चित असला तरी ३० दिवसांत संबंधित निधी खर्च करण्यात येईल. 
- आर.एस. वसतकार
प्रभारी समाज कल्याण अधिकारी, 
जिल्हा परिषद, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beneficiaries get benefit of Social Welfare Scheme in akola