खबरदार... वाघाला नाव ठेवाल तर...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी सुरक्षा व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र प्रकल्पातील वाघांना मर्जीप्रमाणे नाव देणे आणि त्याचे ठिकाण जाहीर करण्यावर निर्बंध घातले आहेत. याचे पालन न करणाऱ्या रिसॉर्ट, होम स्टे मालक, पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकांवर निलंबनासह कायमस्वरूपी बंदीच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत. असा निर्णय घेणारे राज्यातील ताडोबा प्रकल्पाचे हे पहिलेच क्षेत्र संचालक आहेत.
वाघाला नाव नसते, गावही नसते, तो जंगलाचा राजा असतो हीच त्याची खरी ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उत्साही वन्यजीवप्रेमी, पर्यटक मार्गदर्शक, वनाधिकारी वाघांना नाव देऊन प्रसिद्धी मिळवणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया, गब्बर, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात जय, बुट्टू, श्रीनिवास ही नावे चर्चेत आली होती. पंधरा दिवसांपूर्वी माया वाघिणीचा मीरा या बछड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती. वन विभाग वाघांना वाचविण्यासाठी, वाघाला नाव दिल्यास पर्यटकांचे विशिष्ट वाघाकडे अधिक लक्ष केंद्रित होते. अनावश्‍यक महत्त्वही प्राप्त होते. प्रसंगी पर्यटन क्षेत्रातील वाघ प्रसिद्धी झोतात येतात. नैसर्गिक प्रक्रियेनुसार किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाघ मरण पावल्याचे त्यालाही प्रसिद्धी अधिक मिळते. अनेक पर्यटक संबंधित वाघाच्या नावाने सोशल मीडियावर छायाचित्र शेअर करतात. शिकाऱ्यांना वाघाचे ठिकाण कळत असल्याने ते त्यांचे लक्ष्यही होऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर वाघांच्या नावांचा उल्लेख केलेला असल्यास नोटीसीच्या तारखेपासून तीस दिवसांच्या कालावधीत असा मजकूर हटविण्यात यावा. या नियमांचे पालन न केल्यास किमान 15 दिवस निलंबनापासून ते कायमस्वरूपी बंदीपर्यंत आवश्‍यकतेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
पर्यटनासाठी आलेले पर्यटकही विशिष्ट नावाच्या वाघाला दाखविण्यासाठी हट्ट धरतात. त्यातून वाघाशी भावनिक नाते तयार होत जाते. परिणामी, पर्यटक मार्गदर्शक नवख्या पर्यटकाला कोणताही वाघ दाखवून बोळवण करतात. पर्यटकही संबंधित नावाचा वाघ पाहिल्याने पर्यटक मार्गदर्शकावर खुश होऊन "मोठी टिप'ही देतात. काही पर्यटक मार्गदर्शकांचा हा धंदा झालेला असल्याचे लक्षात आले आहे. पर्यटकांना वाघ दिसला तरी विशिष्ट नावाचा वाघ पाहण्याची अधिक इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे इतर वाघांची किंमत वाटत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे.
एखादा पर्यटक विशिष्ट वाघ दाखविण्यासाठी मार्गदर्शकावर जबरदस्ती करीत आहे, असे लक्षात आले अथवा संबंधितांनी सांगितले तर भविष्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात त्या पर्यटकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांना नाव देण्यासंबंधी नियम केले आहे. त्यानुसार कोणत्याही वाघाला टी 1, टी 2 अशा प्रकारची नावे देणे अपेक्षित आहे. कोणीही वाघांना नावे देत असेल तर त्याचे पुरावे मिळाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कान्हा व्याघ्र प्रकल्पात असा निर्णय झालेला आहे.
- एन. आर. प्रवीण, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com