सावधान, सापांच्या प्रजाती होताहेत नष्ट, त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्याची गरज... 

सुधीर भारती 
Saturday, 25 July 2020

अमरावती तसेच मेळघाटच्या जंगलांमध्ये सापांच्या जवळपास 35 प्रजाती आढळून येतात. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, वायपर, पोवळ्या या जातींचे साप विषारी आहेत. फारच कमी साप विषारी असतात.

अमरावती  : घरात किंवा घराच्या परिसरात एखादा साप दिसला की त्याची कुठलीही माहिती न घेता अनेकजण त्याला मारतात किंवा माहिती नसलेल्या सर्पमित्रांकडून त्याला पकडून त्याच्या अधिवासाची माहिती न घेता जंगलात कुठेही सोडले जाते. याचा परिणाम म्हणून अनेक सापांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. अनेक साप असे आहेत की, ते घराच्या आसपासच राहतात, कारण त्यांच्यासाठी तेच वातावरण "सुटेबल' असते. त्यामुळे आता नागरिकांनीसुद्धा पशुपक्षांच्या बाबतीत दक्ष होऊन लुप्त होणाऱ्या सापांच्या प्रजातींना वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. 

अमरावती तसेच मेळघाटच्या जंगलांमध्ये सापांच्या जवळपास 35 प्रजाती आढळून येतात. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, वायपर, पोवळ्या या जातींचे साप विषारी आहेत. फारच कमी साप विषारी असतात. इतर सर्व बिनविषारी आहेत. यापैकी पोवळ्या जातीचा साप प्रामुख्याने जुन्या अमरावतीच्या परिसरात म्हणजेच अंबागेट, अंबादेवी मंदिर परिसरात आढळून येतो. अनेक सापांचे खाद्य घरातील किडे, पाली हेच आहे. ते जंगलात राहूच शकत नाहीत. ते आपल्या घराच्या परिसरातच वावरतात, याची नागरिकांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. 

अवश्य वाचा- असह्य वेदनांची अखेर; संजीवनीची कर्करोगाशी झुंज अपयशी, तरीही बारावीत मिळविले तब्बल एवढे टक्के....

सापांना मारण्यापेक्षा त्यांना वाचविणे गरजेचे आहे. त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. यासंदर्भात अमरावती शहरातील सर्पमित्र राघवेंद्र नांदे यांनी सांगितले की, अनेकांना सापांविषयी शास्त्रीय माहिती नसते. त्यांना पकडून कुठेही सोडून दिले जाते. मात्र, त्या अधिवासात साप अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. घरात साप शिरला तरी त्याला न मारता त्याची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली पाहिजे. सर्पमित्रांनी आधी शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे आहे. कुठल्याही स्वार्थाशिवाय त्यांनी सेवा दिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

अवश्य वाचा- विचित्र अपघात! तीन ट्रकला उडवून तो धडकला पेट्रोल पंपावर आणि....

 

पृथ्वीवर केवळ सापच नव्हे तर प्रत्येत पशू आणि पक्षाची उपयोगिता मानवाला आहे. एखादा पशू किंवा पक्षी निरुपयोगी आहे, असे होत नाही. त्यामुळे प्राणीमात्रांच्या संरक्षणाची जबाबदारी सुशिक्षित समाजाने पार पाडली पाहिजे. 
- राघवेंद्र नांदे, सर्पमित्र अमरावती. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware, snake species are becoming extinct, they need to be released into their habitat ...