भामरागड पंचायत समितीला मिळेना गटविकास अधिकारी; विकासकामांवर होतोय परिणाम 

Bhamragadh gram panchayat has no development officer
Bhamragadh gram panchayat has no development officer

भामरागड (जि. गडचिरोली) : मागील अनेक वर्षांपासून येथील भामरागड तालुक्‍यातील प्रशासकीय कार्यालयाला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत. विशेष म्हणजे अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत तब्बल 21 अधिकारी बदलले आहेत.

तालुक्‍यातील संपूर्ण गावाच्या विकासाची धुरा सांभाळणाऱ्या पंचायत समितीमध्ये कायम अधिकारी मिळत नसल्यामुळे विकासकामे प्रभावित होत आहेत. पंचायत समितीमध्ये आरोग्य, शिक्षण, बांधकाम, बालकल्याण, मनरेगा, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत, इंदिरा आवास, संपूर्ण स्वच्छता अभिमान, कृषी, पेसा, असे अतिमहत्त्वाचे व थेट गावविकासाचे उपक्रम राबविण्याची जबाबदारी पंचायत विभागाला असते. 

मात्र पंचायत समिती भामरागडला प्रभारी गट विकास अधिकाऱ्यामुळे व त्याच्या होणाऱ्या सतत बदलीमुळे विकासाची गती मंदावली आहे. अनेक कामांना खीळ बसली आहे. 2009 ते 2020 या 10 वर्षांच्या कालावधीत एकूण 21 संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पंचायत समिती भामरागड येथे बहुतांश प्रभारी व काही प्रमाणात नियमित स्वरूपात कार्याचा अनुभव आहे. त्यापैकी 14 अधिकारी प्रभारी म्हणून नेमण्यात आले व 7 अधिकारी नियमितपणे रुजू झाले. 

अधिकाऱ्यांच्या संगीत खुर्चीच्या प्रवासात पंचायत समितीत अडचणी आल्याने भामरागड तालुका विकासापासून कोसो गेला दूर आहे. नेहमी प्रभार असणारे अधिकारी हे अन्य विभागाशी संबंधित असल्याने त्यांना पंचायत समितीचा कारभार समजणे जरा कठीण जाते. त्यातच कारभार समजण्याआधीच परत दुसऱ्याला पदभार देऊन त्यांना मूळ पदस्थापनेत पाठवले जाते. त्यामुळे विकासात्मक विषय जसेच्या तसेच राहून जातात. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 

प्रभारी अधिकाऱ्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याने पंचायत समितीला अधिकारी बदलला की खाते पण बदलावे लागते. तसेच सर्व खाते बदलविण्याआधीच परत प्रभार दुसऱ्याला दिला जातो. आता नुकतेच आलेले संवर्ग विकास अधिकारी अशोक सोनटक्‍के हे भामरागड पंचायत समितीला रुजू झाले. त्यांची शेवटची फक्त 10 महिन्यांची सेवा शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय जोराचा वापर करून अवघ्या तीन महिन्यांतच पंचायत समिती वाडा जिल्हा पालघरला बदली करून घेतली. त्यानंतर प्रभाग कोणास द्यावा, हा प्रश्‍न वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला. 

लगेच एक वर्षा आधी रुजू झालेले बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल चव्हाण यांना प्रभार देण्याचे ठरविण्यात आले. राहुल चव्हाण रुजू होताच अंगणवाडी केंद्रातील अनेक समस्या मार्गी लावत असून सतत दौरे करून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांनी वचक निर्माण केला. तसेच तालुका कुपोषणमुक्त करण्याचा मानस ठेवून काम करत होते. परंतु अचानक दिलेल्या प्रभारामुळे त्यांना आपल्या त्यांना आपल्या नियमित विभागाच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड पंचायत समितीवर असा अन्याय का, असा प्रश्‍न भामरागड तालुकावासी विचारत आहेत.

कायमस्वरूपी आवश्‍यक....

भामरागड तालुक्‍याचा विकास साधायचा असेल तर प्रशासकीय कार्यालयात प्रभारी अधिकारी न देता नियमित संवर्ग अधिकारी देण्याची आवश्‍यकता आहे. तेही सलग दोन ते तीन वर्षे बदली न करता असे अधिकारी ठेवल्यास भामरागड तालुक्‍याच्या विकासाला गती प्राप्त होईल. त्यामुळे तालुक्‍यात किमान तीन वर्षांसाठी कायमस्वरूपी अधिकारी देण्याची मागणी नागरिक करत आहेत.
 
संपदान - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com