मोठी बातमी : चिमुकल्यासमोरच आई-वडिलांना संपविले, भंडारा जिल्हा हादरला 

In Bhandara district Parents killed in front of child
In Bhandara district Parents killed in front of child

भंडारा : शेजाऱ्यांमध्ये होणारे वाद ही काही नवीन घटना नाही. भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी येथील शेजाऱ्यांमध्ये सतत वाद व्हायचा. लहानसहान कारणांवरून दोन्ही कुटुंबात खटके उडायचे. त्यातील मुख्य वाद अवैध दारूविक्रीवरून होता. त्याच वादातून ही मोठी घटना घडली. 

भंडारा तालुक्‍यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सालेबर्डी येथे आरोपी मंगेशचा शेजारी असलेल्या विनोद बागडेसोबत सातत्याने वाद सुरू होते. विनोग बागडे राहत्या घरातून अवैध दारूविक्री करत असल्याने शेजारी राहणाऱ्या आरोपी मंगेशसोबत त्याचे खटके उडत होते. या दोघांनीही परस्परांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सालेबर्डी येथे हातभट्टीची दारू विकणारा विनोद परमानंद बागडे (वय 39) याच्या शेजारी आरोपीचे घर आहे. विनोद व त्याची पत्नी प्रियांका बागडे (वय 31) यांच्या अवैध व्यवसायावरून मंगेश गजभिये याचा अनेकदा वाद झाला होता. त्याने हा व्यवसाय बंद करण्यासाठी वारंवार सांगितले होते. दारू पिण्यास येणाऱ्या दारुड्यांमुळे या भागात सायंकाळी गोंधळ निर्माण होत होता.

याच कारणावरून मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा भांडण झाले. यात मंगेशने लोखंडी रॉडने विनोद व त्याच्या पत्नीवर हल्ला करून त्यांचा खून केला. हा संपूर्ण प्रकार विनोद याच्या पाच वर्षीय मुलासमोर घडला. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी पंचनामा करून आरोपीला अटक केली आहे. 

दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्ववैमनस्य असल्याचे सांगितले जाते. एकाच कुटुंबातील दोन जणांची रॉडने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण भंडारा जिल्हा हारदला आहे. सालेबर्डी गावात राहणाऱ्या आरोपी मंगेश गजभियेने आपल्या शेजाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. 

आरोपीची पोलिसांत कबुली 


मंगळवारी रात्री मृत विनोदचा पाळीव कुत्रा आरोपी मंगेशच्या घरी गेल्यानं त्याला राग आला आणि त्याने कुत्र्याला मारहाण केली. यावरून मंगेश आणि विनोदमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. संताप अनावर झाल्यानं आरोपी मंगेशने शेजारी असलेल्या लोखंडी रॉडने विनोदला मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीवरही रॉडने वार केले. यात गंभीर जखमी झाल्यानं विनोद आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्यांच्या चिमुकल्या मुलाने पाहिली. आरोपीने घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत कबुली दिली. आरोपी मंगेश गजभिये याला कारधा पोलिसांनी अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com