भंडारा पोलिस, शाब्बास! क्रेडिट कार्डमधून पळवलेली रक्कम दिली मिळवून परत 

on line fraud
on line fraud

भंडारा : सध्या वेगवेगळे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशाच प्रकारे आरोपीने एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाइन पद्धतीने रक्कम पळविली होती. ती रक्कम भंडारा सायबर पथकाने संबंधित व्यक्तीला परत मिळवून दिली आहे. 

भंडारा येथील गिरीधर खापेकर शुक्रवारी, 10 जुलै रोजी सकाळी पूजापाठ करीत असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून त्यांचे स्टेट बॅंकेचे क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगितले. ते सुरू करण्यासाठी एटीएम कार्ड क्रमांक विचारला. त्यानुसार खापेकर यांनी एटीएम कार्ड क्रमांक आणि ओटीपी नंबर सांगितला. मात्र, त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून काही वेळातच 47 हजार 228 रुपये काढण्यात आले. यामुळे धक्का बसल्याने खापेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

पोलिसांनी त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा केला असता त्यांच्या क्रेडिट कार्डमधून गेलेल्या रकमेने अज्ञात आरोपींनी फ्लिपकार्डच्या माध्यमातून वस्तू खरेदी केल्याचे आढळले. सायबर सेलने फ्लिपकार्ड कंपनीसोबत त्वरित संपर्क साधून ऑनलाइन झालेल्या व्यवहारातून ट्रान्जेक्‍शन रद्द करून फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्याची रक्कम परत करण्यास विनंती केली. त्यानंतर खापेकर यांच्या खात्यात पळविलेली रक्कम परत आली. 

भंडारा सायबर सेलने जानेवारी 2020 पासून आतापर्यंत ऑनलाइन फसवणूक झालेल्या वेगवेगळ्या तक्रारकर्त्यांना एक लाख 17 हजार 228 रुपये परत मिळवून दिले आहे. या कामगिरीकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सायबर सेलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे, सहायक पोलिस निरीक्षक भूषण पवार, पोलिस नायक दिनेंद्र आंबेडारे, गौतम राऊत, स्नेहल गजभिये, राज कापगते, सुमेध रामटेके, श्री. नाहोकर यांनी केली आहे. 

आजच्या तांत्रिक व डिजिटल युगात सर्व नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना चोरट्यांच्या आमिषाला बळी पडू नका. आपले वैयक्तिक बॅंक खाते, एटीएम, आधार कार्ड, महत्वाच्या कागदपत्रांची माहिती कोणालाही फोनवर सांगू नका. असा प्रकार झाल्यास त्वरित बॅंक अधिकारी व पोलिसांना कळवावे. 
-अरविंद साळवे 
पोलिस अधीक्षक, भंडारा. 

 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com