घरातच उघडला होता त्याने बनावट विदेशी दारूचा कारखाना, अन् एक दिवस.... 

सुरेंद्र चापोरकर
Sunday, 12 July 2020

विक्की नवानी आपल्या कारमधून चार पेट्या बनावट दारू विक्रीसाठी नेत असताना गाडगेनगर परिसरात पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता धक्कादायक प्रकार पुढे आला.

अमरावती : शहरातील रामपुरी कॅम्प या सिंधी समाजाची वस्ती असलेल्या परिसरातील एका घरी अनेक वर्षांपासून स्वतः घरमालक बनावट विदेशी दारू बनवून विकण्याचा गोरखधंदा करीत होता. पोलिसांनी माहिती होताच त्यांनी छापा टाकून तेथून बनावट विदेशी दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. 

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गजबजलेल्या रामपुरी कॅम्प 
परिसरात विक्की प्रकाश नवानी (वय 26) या युवकाचे घर आहे. तो आपल्या घरीच बनावट विदेशी दारू बनवून ती विकायला न्यायचा. पोलिसांना या प्रकाराची माहिती झाली. त्यांनी त्यावर पाळत ठेवली. विक्की नवानी आपल्या कारमधून चार पेट्या बनावट दारू विक्रीसाठी नेत असताना गाडगेनगर परिसरात पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता धक्कादायक प्रकार पुढे आला.

अवश्य वाचा- आईला मारहाण केल्याने मुलाने पाडला बापाचा मुडदा....

विक्की अनेक वर्षांपासून घरीच बनावट विदेशी दारू बनविण्याचा गोरखधंदा चालवित असल्याचे घटनास्थळावरील दृश्‍यांवरून निदर्शनात आले. त्या ठिकाणी पोलिसांना बनावट दारू बनविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या रासायनिक पदार्थ्यांचे पाऊच, फ्लेवर, काही नशेच्या गोळ्यांचा साठा तसेच दारूच्या बॉटलवर लावण्यासाठी छापलेले लेबल तेथे आढळले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात रामपुरी कॅम्प परिसरात त्याचा धंदा तेजीत होता. या प्रकारावरएक्‍साइज किंवा पोलिसांची आतापर्यंत नजर गेली कशी नाही, हाच मुख्य प्रश्‍न आहे. 

अवश्य वाचा- अखेर त्या अनाथ  पिलास मिळाली आई

अनेकांनी ढोसली बनावट दारू 

ज्या काळात लॉकडाउन होते, तेव्हा विक्कीने लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा बनावट साठा मार्केटमध्ये पुरविला. अनेकांनी हीच बनावट दारू ढोसली. बनावट दारूच्या पॅकिंगसाठी त्या आकाराच्या बॉटल विक्की भंगारवाल्यांकडून विकत घेत होता. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या ब्रॅंडचे लेबल लावून ती विकत होता.  

 संपादन - राजेंद्र मारोटकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He had opened a fake foreign liquor factory at home and police trapped