मुदत संपूनही वाळूचोरी सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • वाळूचा अवैध उपसा 
  • महसूल कर्मचारी झोपेत 
  • लाखांदूर तालुक्‍यात घाटावर वाळूचे साठे 
  • शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

लाखांदूर (जि. भंडारा) : जिल्ह्यात संपूर्ण वाळूघाट बंद असल्याने वाळूची मागणी वाढली आहे. अशातच तालुक्‍यातील खोलमारा, बोथली, आसोला, ईटान वाळूघाटांच्या जवळ दिवसाढवळ्या घाटमालकच अवैध वाळूची साठवणूक करीत आहेत. यातून बिना रॉयल्टी ट्रकने वाळू विक्री सुरू आहे. तालुक्‍यात पहिल्यांदाच असे प्रकार सुरू असल्याने महसूल कर्मचारी झोपेत आहेत की, प्रशासनाने वाळूघाट मालकांपुढे नांगी टाकली, असा सवाल तालुक्‍यातील जनतेने केला आहे. 

लाखांदूर तालुक्‍यातील वाळूघाटाची मुदत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत नदीतून वाळूउपसा करण्याची परवानगी होती. पावसाळ्यात सततच्या पावसामुळे नदी पात्रात पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे ठेकेदारांना मुदतीच्या आत वाळूची साठवणूक करता आली नाही. त्यामुळे वाळूघाट मालकांनी सध्या वाळूसाठ्यावर अधिक भर दिला आहे. त्यांनी 
भरदिवसा राजरोसपणे ट्रॅक्‍टरद्वारे वाळूचा अवैध उपसा सुरू केला आहे. यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. 

पांढऱ्या शुभ्र वाळूला मोठी मागणी 

अवैध वाळूउपसा प्रकरणी दबावतंत्र व अर्थकारणाचा वापर करून हे घाटमालक शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. 
भंडारा जिल्ह्यातील बारीक व पांढऱ्या शुभ्र वाळूला नागपूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बरेचसे अवैध घाट कायमचे बंद झाले आहेत. त्यामुळे आता अवैध वाळूउपसा लाखांदूर तालुक्‍यातील खोलमारा, बोथली,आसोला, ईटान या घाटांवरून घाटमालकांच्या पुढाकाराने सुरू आहे. 

साधी चौकशीही नाही 

तालुक्‍यात सतत वाळूचोरी सुरू असताना महसूल प्रशासनाकडून आतापर्यंत साधी चौकशीही झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी त्वरित अवैध वाळूउपसा व वाळू वाहतुकीच्या विरोधात कठोर कारवाई करून नदीपात्रालगत होत असलेले पर्यावरणाचे नुकसान थांबवावे अशी मागणी तालुक्‍यातून होत आहे. 

रोजगाराच्या नावावर चोरी 

रोजगार देण्याच्या नावाखाली सर्रास वाळूचा उपसा करण्यात येत आहे. नदीपात्रातून ट्रॅक्‍टर व मजुरांच्या मदतीने नदीकाठावर वाळूचे साठे केले जात आहेत. त्यानंतर जेसीबीद्वारे दररोज ट्रकमधून विक्रीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली जाते. दररोज अवैध वाळूचे ट्रक नदीघाटावरुन रवाना होत आहेत. हा प्रकार दिसत असूनही महसूल प्रशासन मूग गिळून आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक वाळूचा उपसा करून वाळूची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara : Sand thefting continues even after the deadline