
भंडारा : ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू
भंडारा - खरबी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकने समोर जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात केबिनमधील दोन वाहकांचा जागीच मृत्यू झाला. तसेच गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातातील मृतांची नावे रोहित हिरालाल पटेल (वय २२), मुरारी दिलीप सिंग (वय २८), आणि चालक शत्रोहन प्रभू प्रसाद (वय ३०, रा. गोपालगंज, बिहार) अशी आहेत. खरबी येथे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रायपूर-नागपूर लेनवरून ट्रक (क्रमांक जीजे ३६/व्ही ९४९५) नागपूरकडे जात होता. याच लेनवर मागून भरधाव आलेला ट्रक (क्रमांक सीजे ०४/जेसी ४०१३) समोर जात असलेल्या ट्रकवर मागून धडकला. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचे केबिन पुढच्या ट्रकमध्ये शिरल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने वाहक रोहित हिरालाल पटेल व मुरारी दिलीप सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच चालक शत्रोहन प्रभू प्रसाद जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली होती. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. जवाहरनगर पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी पहाटेपासून वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते.
Web Title: Bhandara Three Dead In Loaded Truck Road Accident National Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..