Vidhan Sabha 2019 भंडारा मतदारसंघात : भाजपसमोर अपक्षांचे कडवे आव्हान

श्रीकांत पनकंटीवार
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

भंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपसाठी अनुकूल आहे. कोणतीही निवडणूक असो, या मतदारसंघात भाजपला मताधिक्‍य मिळतेच. मतदारसंघात असलेले पक्षसंघटन व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे भाजपला विजयापासून रोखणे कठीण असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र, युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंडखोरी केल्याने भाजपसमोर जागा टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या मतदारसंघात भाजप-अपक्ष उमेदवारामध्ये थेट लढतीचे चित्र आहे.

भंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपसाठी अनुकूल आहे. कोणतीही निवडणूक असो, या मतदारसंघात भाजपला मताधिक्‍य मिळतेच. मतदारसंघात असलेले पक्षसंघटन व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे भाजपला विजयापासून रोखणे कठीण असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र, युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बंडखोरी केल्याने भाजपसमोर जागा टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या मतदारसंघात भाजप-अपक्ष उमेदवारामध्ये थेट लढतीचे चित्र आहे.
बहुजातीय मतदार असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गासह तेली, कुणबी, मुस्लिम मतदारांची संख्या बरीच आहे. एकाच जातीचे वर्चस्व नसले तरी या मतदारसंघात जातीयवाद मोठ्या प्रमाणात चालत असल्याने राजकीय परिस्थिती नेहमी वेगळीच असते.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेला मतदारसंघ 2009 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. युतीत मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी विजय मिळविला. भाजपने युतीधर्म पाळल्याने शिवसेनेला विजय मिळविता आला. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची युती तुटल्याने स्वतंत्रपणे लढविण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे ऍड. रामचंद्र अवसरे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळाले. शहरासह ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी व बूथस्तरावर असलेली कार्यकर्त्यांची फळी भाजपसाठी विजयाची नांदी ठरली. आतापर्यंत कोणतीही निवडणूक असो यात भाजपला या मतदारसंघात विजयाचा सूर गवसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भंडारा मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्‍य मिळाले. यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळेल, अशी आशा भाजपला आहे. मात्र, शिवसेनेची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. युतीत भंडारा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, अशी मागणी असताना विद्यमान आमदार भाजपचा असल्याने शिवसेनेची मागणी धुडकावून लावली. भाजपकडून अनेकजण दावेदार असल्याने मित्रपक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) गटाच्या वाट्याला देऊन भाजपने एकप्रकारे शिवसेनेला शह दिला. रिपाइंने भाजप पदाधिकाऱ्यास उमेदवारी दिल्याने ताब्यात असलेला मतदारसंघावर विजय मिळविण्याचे कडवे आव्हान भाजपसमोर आहे.

आघाडीची आटापिटा
मागील दहा वर्षांपासून विधानसभेवर झेंडा फडकविण्यासाठी आटापिटा करीत असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला अद्यापही यश आले नाही. यावेळी आघाडीने रिपा (कवाडे) गटाला उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. मागील अनेक वर्षांपासून मतदारसंघात संपर्क ठेवून असलेल्यास उमेदवारी न देता नागपूर येथे पार्सल उमेदवार कार्यकर्त्यांवर लादला. परिणामी, कार्यकर्त्यांनी प्रचारापासून स्वत:ला दूर सारले आहे. यामुळे या निवडणुकीतही आघाडीला यश मिळण्याची आशा धूसर झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhandara vidhansabha constituency