भंडारा : पुलावरून वाहतूक करताय...जरा सांभाळून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- वैनगंगेच्या जुन्या पुलावरून वाहतूक
- जीवघेणा प्रवास
- प्रवाशांचा जीव धोक्‍यात
- पुलाची जीर्ण अवस्था
- प्रशासनाचे दुर्लक्ष

भंडारा : वैनगंगा नदीवरील 90 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून आजही जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करीत आहेत. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जुना पूल पाण्याखाली दोनवेळा बुडाला होता. यापूर्वीही अनेकदा पुराचे पाणी पुलावरून गेले आहे. सध्या पाण्याची पातळी अगदी जवळ असूनही अशास्थितीत पुलावरून शेकडो दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे.

वैनगंगा नदीवरील लहान पूल ब्रिटिशांनी 1929 मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे. परंतु, नवीन पूल तयार झाला; तरी जुना पूल मात्र
वाहतुकीस सुरू आहे.

कारधा व परिसरातील नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने याच पुलाचा वापर करीत असतात. ऑगस्ट 2016 मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाइप टाकून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना ये-जा करण्यास जुना पूल सोयीचा होत असल्याने लोखंडी पाइप काढण्यात आले.

सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद असली; तरी पादचारी व दुचाकींची वाहतूक सुरू आहे.
ब्रिटिशांच्या काळात बांधलेला हा दगडी पूल अगदी अरुंद आहे. गोसे प्रकल्प झाल्यानंतर पाण्याची पातळी पुलापर्यंत राहते. पावसाळ्यात तर वैनगंगगेला पूर आला की लहान पुलावरून पाणी वाहू लागते.

या पुलाची कालमर्यादा संपली असून तो वाहतुकीस योग्य नाही. मात्र त्यानंतरही कारधाकडे जाण्यासाठी जवळचा पूल म्हणून आजही शेकडो नागरिक लहान पुलाचाच उपयोग करतात. दुचाकी, रिक्षा आदी वाहने येथून भरधाव जातात. यावर्षी पावसाळ्यात दोनदा या पुलावरून पुराचे पाणी वाहून गेले. सुरक्षा कठडेही तुटले होते. पुलावर मोठाले खड्डेही पडले आहेत. अशा स्थितीत जीवघेणा प्रवास सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
तीन वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातल्यानंतरही वाहतूक सुरू आहे. सध्या वैनगंगा दुथडी भरून वाहत असून लहान पुलावरून जीव मुठीत घेऊन धाकधुकीतच प्रवास करावा लागतो. तरीही वाहनधारक न जुमानता जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत.

याप्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सकाळी व सायंकाळी या पुलावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वी नदीत वाहने कोसळून दुर्घटना झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara: You are transporting from the bridge ...