esakal | एका रात्री उपाशीपोटी झोपले भीमराव, सकाळी उठलेच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

तिवसा : घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस.

तिवसा येथील पिंगळाई नदीच्या भुयारी मार्गाच्या बाजूला शनिवारी (ता. 22) दुपारी एक वाजता 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. भीमराव उद्धवराव मेटांगे, असे मृताचे नाव आहे. उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एका रात्री उपाशीपोटी झोपले भीमराव, सकाळी उठलेच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : भीमराव उद्धवराव मेटांगे तालुक्‍यातील डेहनी गावातील रहिवासी होते. काही वर्षांआधी त्यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मेटांगे यांचा मृत्यूही उपासमारीने झाल्याचे सांगण्यात येते.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात भीमराव मेटांगे (वय 65) इकडून-तिकडे फिरत होते. कुणालाही पाच-दहा रुपये भीक मागून आपल्या पोटाची भूक भागवीत होते.

ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून खायला अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही वर्षांआधी पत्नी, मुलाचाही मृत्यू

मेटांगे हे मूळचे तिवसा तालुक्‍यातील डेहनी या गावातील रहिवासी आहेत. काही वर्षांआधी त्यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे ते एकटे पडले. अनेक वर्षांपासून ते तिवसा शहरातच वास्तव्याला होते. मिळेल ते खाऊन कुठेही झोपणे, रस्त्याने गाणे म्हणत जाणे, असा त्यांचा दिनक्रम होता.

भुकेमुळे झोपेतच झाला मृत्यू

शनिवारी सकाळी भुयारी मार्गाच्या बाजूला मेटांगे झोपले होते. त्याच परिसरातील विजय नेमाडे यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे नेमाडे यांनी तत्काळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक भूषण यावले यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर यावले यांनी घटनेची माहिती तिवसा पोलिसांना दिली.

हेही वाचा : अनैतिक संबंधात तो ठरत होता अडसर, दिली तिने त्याची सुपारी


डेहनी येथे अंत्यसंस्कार

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व डेहनी येथील मेटांगे यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन तिवसा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. या वेळी भूषण यावले यांनी मेटांगे यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना आर्थिक सहकार्य केले. डेहनी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.